मुंबई प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली असून संभाव्य पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्यभरात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) १७ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) ६ पथकांना तैनात करण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (SEOC) केले आहे.
मान्सून काळ लक्षात घेऊन राज्यभरात संवेदनशील ठिकाणी NDRFची पूर्वतयारी करण्यात आली आहे. पालघर आणि नागपूर येथे प्रत्येकी दोन पथके तैनात करण्यात आली असून पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि धाराशिव येथे प्रत्येकी एक पथक कार्यरत आहे. मुंबईसारख्या अतिसंवेदनशील शहरासाठी चार स्वतंत्र NDRF पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. याशिवाय SDRFची सहा पथके धुळे आणि नागपूर येथे प्रत्येकी दोन, तर नांदेड आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा स्वरूपात तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे १५१.२ मिमी, कुलाबा येथे १२८ मिमी पाऊस झाला. घाटमाथ्यावर पावसाने विक्रमी हजेरी लावत लोणावळ्यात ६७० मिमी, ताम्हिणीत ५८० मिमी, अंबोना येथे ५३७ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. याशिवाय माथेरान (३०२ मिमी), कर्जत (२९१.५ मिमी), मुळशी (२३० मिमी), पनवेल (१८२.५ मिमी), जुहू विमानतळ (३२५ मिमी) आणि भाईंदर (१८८.५ मिमी) येथेही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या पावसामुळे माथेरान, लोणावळा, खोपोली आणि लोहगड परिसरात भूस्खलनाचा धोका तीव्र झाला असून या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन, NDRF आणि इतर यंत्रणांच्या समन्वयातून बचावकार्य सुरू असून राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून GEO-DSS प्रणालीच्या माध्यमातून धोक्याचे विश्लेषण करून वेळोवेळी सतर्कतेचे संदेश पाठविण्यात येत आहेत.
अतिवृष्टीचा फटका राज्याच्या वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. खोपोली परिसरात पाणी साचल्याने जुना मुंबई-पुणे महामार्गही बंद ठेवण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच मिसिंग लिंक प्रकल्पाच्या परिसरात दरडी कोसळल्यामुळे दोन्ही दिशेतील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. रेल्वे मार्गावरही मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान दरडी कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्ते आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात घोरावाडी (तळेगाव दाभाडे) येथे पुराच्या पाण्यात २५ प्रवाशांसह एक बस अडकली होती. घटनास्थळी तातडीने NDRFचे पथक रवाना करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
याच तालुक्यातील पाटण येथे दरड कोसळून एक घर गाडले गेले असून तीन ते चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तेथे NDRFचे पथक बचावकार्य राबवत असून ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे.
मुंबईतील मानखुर्द परिसरात झोपडपट्टीवर इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. बचाव आणि शोधमोहीम सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली.
दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी नदी, नाले, धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


