मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारीही थैमान घातले. मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणातील अनेक भागांत अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील मानखुर्द येथे धोकादायक घोषित करण्यात आलेल्या तीन मजली चाळीचा भाग कोसळून सहा लहान मुले, एक महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासनाकडून चाळ रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पावसामुळे इमारतीचा भाग अचानक कोसळला. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले होते. बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले; मात्र आठ जणांचा जीव वाचवता आला नाही.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने सोमवारी (६ जुलै) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरासाठी यलो अलर्ट असून पुणे व सातारा घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरांत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले. त्याचा परिणाम पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर झाला असून कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडीची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्व रेल्वे स्थानक परिसरातही पावसामुळे गंभीर जलसंचय झाला. स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर कमरेभर पाणी साचल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परिसरातील एक होर्डिंग कोसळले; सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रायगड जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा, कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा आणि उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महाड, खोपोली, कर्जत, रोहा, नागोठणे, पेण आणि पोलादपूर परिसरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून काही भागांत दरडी कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात गुंडेनूर नाल्याला आलेल्या पुरामुळे सात गावांचा संपर्क तुटला आहे. नाल्यावरील पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. विद्यार्थी, रुग्ण आणि अत्यावश्यक सेवांसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
हवामान विभागाने पुढील काही तास राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगितले असून नागरिकांनी नदी-नाले, पूरग्रस्त भाग आणि दरडप्रवण क्षेत्रांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


