रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या विमानतळ प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून, येत्या तीन महिन्यांत रत्नागिरी विमानतळावरून पहिले विमान उड्डाण करेल, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरी विमानतळ आणि विविध विकासकामांच्या सामंजस्य करार (एमओयू) कार्यक्रमात ते बोलत होते. या घोषणेमुळे कोकणातील हवाई संपर्काचे अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे मानले जात आहे.
सामंत म्हणाले, “रत्नागिरी विमानतळ हा केवळ घोषणांपुरता मर्यादित राहील, अशी टीका सातत्याने होत होती. मात्र, आता त्या सर्व शंकांना पूर्णविराम मिळाला आहे. येत्या अवघ्या तीन महिन्यांत येथून पहिले विमान उड्डाण करेल. हा रत्नागिरीच्या विकासाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे.”
यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सहकार्यामुळे विमानतळाशी संबंधित अनेक प्रशासकीय अडथळे दूर झाले, असे सांगत त्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कामाचे कौतुक केले. या अधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळेच प्रकल्प वेगाने पुढे सरकत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विमानतळासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेत निधीअभावी कोणतीही अडचण निर्माण होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करत, गरज भासल्यास आमदार निधीतून आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
कार्यक्रमात बोलताना सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित एक आठवणही सांगितली. रत्नागिरीतील एअर स्ट्रिपची पाहणी केल्यानंतर त्यांनी तिचे कौतुक केले होते आणि बारामतीतही अशाच प्रकारची एअर स्ट्रिप असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती, असे सामंत यांनी सांगितले.
पर्यटनवाढीसाठी मोठे प्रकल्प
रत्नागिरीला पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या वर्षभरात पाचतारांकित हॉटेल उभारण्याची प्रक्रिया सुरू होईल. याशिवाय ‘ट्री हाऊस रेस्टॉरंट’, आधुनिक ॲडव्हेंचर पार्क तसेच पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. रत्नागिरीला ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर विकसित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने विमानतळ परिसरात त्यांना स्टॉल उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळण्याबरोबरच महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘विकासात राजकारण नको’
रत्नागिरीचा सर्वांगीण विकास हेच सर्वांचे समान ध्येय असावे, असे सांगत सामंत यांनी विकासकामांना विरोध करण्याऐवजी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. “जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये राजकारण आणू नये. विकासाला सर्वांनी साथ दिल्यास रत्नागिरीचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही,” असे ते म्हणाले.
विमानतळ सुरू झाल्यानंतर रत्नागिरी आणि कोकणातील पर्यटन, उद्योग, व्यापार तसेच कृषी व मत्स्य व्यवसायाला नवी बाजारपेठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, या घोषणेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


