मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांतराच्या घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेनेच्या (शिंदे गट) कथित ‘ऑपरेशन टायगर-3’ची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. येत्या आठ दिवसांत या मोहिमेअंतर्गत मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, असा दावा शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात आणखी काही नेते आणि लोकप्रतिनिधी पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेची संसदीय ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर-3’ संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर नरेंद्र भोंडेकर यांनी, “लोक येतात आणि जातात. तुम्ही काळजी करू नका. ब्रेकिंग न्यूज मिळत राहील. येत्या आठ दिवसांत ऑपरेशन टायगर-3 होईल,” असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी मोठ्या पक्षांतराची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
यापूर्वी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या विषयावर भाष्य करताना, “ऑपरेशन टायगर-3 कधी होईल, हेही कळणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार आणि माजी मंत्री शिवसेनेत प्रवेश करतील. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर आमचा भर आहे,” असे म्हटले होते.
शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीदेखील “ऑपरेशन 3.0 सुरू झाले असून पुढील काळात मोठा राजकीय भूकंप होईल. त्याची वेळ आणि स्वरूप याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील,” असे वक्तव्य केले होते.
दरम्यान, शिवसेनेतील विविध नेत्यांकडून सातत्याने ‘ऑपरेशन टायगर-3’चा उल्लेख केला जात असला, तरी कोणते नेते पक्षात प्रवेश करणार किंवा त्याबाबतची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


