मुंबई प्रतिनिधी
सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असतानाच झाड कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये अवघ्या १२ तासांच्या कालावधीत दोन जणांचा मृत्यू झाला. कुर्ल्यात ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा, तर आरे कॉलनीत १८ वर्षीय तरुणाचा जीव गेल्याने महापालिकेच्या झाडांच्या देखभाल आणि धोकादायक झाडे हटविण्याच्या यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांनंतर विरोधकांनी बृहन्मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठवली असून, मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कुर्ल्यात दुकानावर झाड कोसळून ज्येष्ठाचा मृत्यू
कुर्ल्यातील नौपाडा परिसरात महापालिकेच्या शाळेजवळील एका दुकानावर मोठे झाड कोसळल्याची घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेत ६३ वर्षीय युनूस कुंडावाला यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आला.
घटनेनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने झाड हटवून परिसराची साफसफाई केली. मात्र, या कारवाईवर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. साकीनाका येथे काही दिवसांपूर्वी नाल्यात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका नागरिकाचा झाड कोसळून मृत्यू झाल्याने सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज समोर
या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात झाड अचानक कोसळल्याचे दिसत आहे. घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी धोकादायक झाडे हटविण्याबाबत प्रशासन आणि आयुक्तांना वारंवार पत्रव्यवहार केल्याचा दावा केला. संबंधित कंत्राटदाराने कामात निष्काळजीपणा केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, सत्ताधारी म्हणून जबाबदारीबाबत विचारणा होताच, “प्रशासन अद्यापही झोपेत असून आवश्यक ती कार्यवाही वेळेत होत नाही,” असे त्यांनी सांगितले.
आरे कॉलनीत तरुणाचा जागीच मृत्यू
दुसरीकडे, आरे कॉलनीतील युनिट क्रमांक १३ मार्गावरून मोटारसायकलवरून जात असताना १८ वर्षीय तरुणावर झाडाची मोठी फांदी कोसळली. या दुर्घटनेत हसन रझा जहांगीर अली सय्यद (१८) हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हसन हा साकीनाका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मनसेचा आंदोलनाचा इशारा
सलग दोन दुर्घटनांनंतर मुंबईतील धोकादायक झाडांच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसेने या घटनांसाठी महापालिकेला जबाबदार धरत निषेध व्यक्त केला असून, कार्यकर्ते काळे पट्टे बांधून घटनास्थळी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित यंत्रणांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.


