पुणे प्रतिनिधी
पुण्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडवणाऱ्या प्रकरणात सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह संस्थेच्या सात विश्वस्तांविरोधात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणूक आणि अपहाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून, २७ शिक्षकांच्या वेतनापोटी असलेली सुमारे ५ कोटी ६ लाख रुपयांची रक्कम न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, संबंधित महिला प्राध्यापिकेचे गेल्या साडेपाच वर्षांपासूनचे १९ लाख ३६ हजार रुपयांचे वेतन थकविण्यात आले आहे. संस्थेतील इतर २६ शिक्षकांनाही दीर्घकाळ वेतन न मिळाल्यामुळे एकूण थकबाकी ५ कोटी ६ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतन न देता त्या निधीचा अपहार झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणात मारुती नवले यांच्यासह संस्थेच्या सचिव सुनंदा नवले, उपाध्यक्ष रचना नवले-अष्टेकर, रोहित नवले तसेच अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिला प्राध्यापिकेच्या तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही वेतन न मिळाल्याने अखेर संबंधित प्राध्यापिकेने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संस्थेची आर्थिक कागदपत्रे, वेतन नोंदी आणि संबंधित व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घडामोडीमुळे पुण्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून, शिक्षकांच्या वेतनासंदर्भातील आर्थिक व्यवहार आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रशासनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित विश्वस्तांची भूमिका अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेली नाही.


