पुणे प्रतिनिधी
गणवेशावरील नावाची पाटी (नेमप्लेट) मुद्दाम मोबाईल, वॉकीटॉकी किंवा ई-चालान मशीनने झाकून स्वतःची ओळख लपवणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, कर्तव्यावर असताना प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची नेमप्लेट स्पष्टपणे दिसली पाहिजे, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांत वाहतूक नियमन, दंडात्मक कारवाई किंवा तपासणीदरम्यान काही पोलीस कर्मचारी गणवेशाच्या वरच्या खिशात मोठ्या स्क्रीनचा मोबाईल, शासकीय वॉकीटॉकी किंवा ई-चालान मशीन अशा पद्धतीने ठेवत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांच्या गणवेशावरील नेमप्लेट पूर्णपणे झाकली जात होती. नागरिकांनी कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची ओळख पटवू नये आणि वाद निर्माण झाल्यास अथवा तक्रार करावयाची असल्यास संबंधिताचे नाव समजू नये, या उद्देशाने हा प्रकार जाणूनबुजून केला जात असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे पोहोचल्या होत्या.
अनेक वेळा नागरिकांकडून चुकीच्या कारवाईचा आरोप झाल्यानंतर त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले जाते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या जातात. मात्र संबंधित कर्मचाऱ्याची नेमप्लेटच दिसत नसल्यामुळे तक्रारींची पडताळणी करताना अडचणी निर्माण होत असल्याचेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत कडक आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार शहरातील सर्व पोलीस ठाणी, वाहतूक शाखा तसेच विविध विभागांच्या प्रमुखांना लेखी सूचना पाठवण्यात आल्या आहेत. कर्तव्यावर असताना प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याची नेमप्लेट स्पष्ट दिसेल, याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर निश्चित करण्यात आली आहे. तसेच आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
यापूर्वीही गणवेशावरील नेमप्लेट स्पष्ट ठेवण्याबाबत पोलीस प्रशासनाने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. मात्र त्याचे पालन अपेक्षित प्रमाणात होत नसल्याचे वारंवार निदर्शनास आले. त्यामुळे आता केवळ सूचना न देता थेट शिस्तभंगाच्या कारवाईचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, पोलीस दलात पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांना त्यांच्या समोर कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची ओळख सहज पटावी, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि पोलीस-जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहेत नव्या आदेशातील महत्त्वाचे मुद्दे?
कर्तव्यावर असताना प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची नेमप्लेट स्पष्ट दिसणे बंधनकारक.
मोबाईल, वॉकीटॉकी, ई-चालान मशीन किंवा अन्य वस्तूंनी नेमप्लेट झाकण्यास सक्त मनाई.
आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई.
पोलीस दलात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यावर भर.


