मुंबई प्रतिनिधी.
प्रशासकीय शिस्त आणि कठोर अंमलबजावणीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध क्षेत्रांतील नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी दुग्ध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांसाठी आठ महत्त्वाच्या नियमांची घोषणा केली असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
पत्रकार परिषदेत मुंडे यांनी सांगितले की, दूध संकलनापासून ते किरकोळ विक्रीपर्यंत संपूर्ण साखळीत अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेची काटेकोर अंमलबजावणी करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.
नवीन नियमांनुसार –
– सर्व घटकांना समान नियम लागू : दूध संकलन केंद्रे, बल्क मिल्क कुलर्स, चिलिंग सेंटर्स, डेअरी, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते अशा सर्वांवर हे आदेश समानपणे लागू राहतील.
– कच्च्या दुधाच्या विक्रीसाठी अट : कच्च्या दुधाची विक्री करताना “हे दूध पिण्यापूर्वी उकळावे” अशी सूचना ग्राहकांना स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करणे बंधनकारक असेल.
– सुरक्षित पॅकेजिंग अनिवार्य : पाश्चराइज्ड किंवा उष्णताप्रक्रिया केलेले दूध केवळ सीलबंद व लेबलयुक्त पॅकेजिंगमध्येच विक्रीस ठेवता येईल.
– फूड-ग्रेड उपकरणांचा वापर : दूध हाताळण्यासाठी आणि साठवणुकीसाठी फक्त स्टेनलेस स्टीलसह अन्नसुरक्षेला अनुरूप (फूड-ग्रेड) उपकरणांचा वापर करावा लागेल.
– संपूर्ण नोंदी ठेवणे बंधनकारक : दूध उत्पादन, संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची नोंद संबंधितांनी जतन करावी लागेल.
– त्वरित शीतसाखळी : दूध संकलनानंतर दोन तासांच्या आत कोल्ड स्टोरेज किंवा चिलिंग सुविधेत पोहोचवून आवश्यक प्रक्रिया करणे अनिवार्य राहील.
– वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र : दूध हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे वैध वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.
– अन्न व्यवसायाची जबाबदारी : अन्नसुरक्षा नियमांचे पालन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अन्न व्यवसाय चालकांवर राहील. नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.
मुंडे यांनी स्पष्ट केले की, ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार दूध उपलब्ध करून देणे, तसेच दुग्ध व्यवसायात स्वच्छता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणे हा या नियमांचा प्रमुख उद्देश आहे.

