मुंबई प्रतिनिधी
पश्चिम आणि हार्बर रेल्वेवरील वाढत्या प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने वांद्रे स्थानकाच्या सर्वांगीण पुनर्विकासाला वेग आला आहे. गरीब नगर परिसरातील अतिक्रमण हटवून उपलब्ध झालेल्या जागेवर स्थानकाच्या पूर्वेकडील पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक ‘एलिव्हेटेड डेक’ उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पामुळे पादचारी पुलांवरील गर्दी कमी होण्याबरोबरच वांद्रे स्थानकाचा ‘मल्टिमॉडल ट्रान्सपोर्ट हब’ म्हणून विकास होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्रकल्पाअंतर्गत स्थानकाच्या पूर्व बाजूस सुमारे ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा एलिव्हेटेड डेक उभारण्यात येणार असून, एकावेळी सुमारे ७०० प्रवाशांची क्षमता या डेकमध्ये असेल. स्थानकाच्या उत्तर व दक्षिण बाजूच्या विद्यमान पादचारी पुलांचा विस्तार करून त्यांना या डेकशी जोडण्यात येईल. डेकवर उपनगरीय रेल्वे गाड्यांचे डिजिटल इंडिकेटर्स, प्रवाशांसाठी प्रतीक्षा व विश्रांतीची व्यवस्था तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), वांद्रे न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा कार्यालय तसेच रिक्षा व बेस्ट बस वाहतुकीचे प्रमुख केंद्र पूर्वेकडे असल्याने या भागात दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. त्याचा विचार करून हा विस्तार करण्यात येत असून, स्थानकातील प्रवासी हालचाल अधिक सुलभ करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, गरीब नगर परिसरातील अतिक्रमण हटवून उपलब्ध झालेल्या जागेचा वापर टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. प्रथम वांद्रे टर्मिनस येथील डिझेल शेडचे स्थलांतर करण्यात येईल. त्यानंतर उपलब्ध जागेत टर्मिनसचा विस्तार करून सात नवीन फलाटांसह अतिरिक्त मार्गिका उभारण्याची योजना आहे. भविष्यात वांद्रे टर्मिनसवर दहा नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
याशिवाय, मुंबई सेंट्रल स्थानकाचाही विस्तार प्रस्तावित असून, सध्या २२ डब्यांच्या गाड्या हाताळण्याची क्षमता असलेल्या फलाटांना २४ डब्यांच्या गाड्यांसाठी सक्षम केले जाणार आहे. रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाचे कामही सुरू असून, त्यानंतर पश्चिम रेल्वेवरील गाड्यांचा कमाल वेग ताशी १००–११० किमीवरून १३० किमीपर्यंत वाढविण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.
वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर वांद्रे स्थानकाचा विस्तार, एलिव्हेटेड डेकची उभारणी आणि टर्मिनसच्या क्षमतेत होणारी वाढ यामुळे पश्चिम व हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना भविष्यात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


