मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी मुंबईतील हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन आर्थिक अडचणीत सापडल्याने पोलिओ आणि सर्पदंशावरील लस निर्मितीचे काम ठप्प झाले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा करत, आठ दिवसांत हाफकिनची विशेष बैठक घेऊन संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
विधानसभेत सर्पदंशाच्या वाढत्या घटनांवर सुरू असलेल्या लक्षवेधी चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. हाफकिनची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असून त्यामुळे देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या पोलिओ आणि सर्पदंश प्रतिबंधक लसींचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
जयंत पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने हाफकिनला पोलिओ लस निर्मितीसाठी सुमारे २०० कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. या कंत्राटाची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या निधीच्या आधारे संस्थेने कच्चा माल खरेदी करून जून २०२६ मध्ये सुमारे ७४ कोटी रुपयांच्या पोलिओ लशींचा पुरवठा केंद्र सरकारला केला.
मात्र, या पुरवठ्याचे देयक ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मिळण्याची अपेक्षा असल्याने सध्या संस्थेकडे नवीन कच्चा माल खरेदी करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. परिणामी, पोलिओ लस आणि सर्पदंशावरील जीवनरक्षक लसींचे उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले असून त्याचा थेट परिणाम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
संस्थेची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करत जयंत पाटील यांनी हाफकिनची आठ दिवसांत बैठक बोलावून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. तसेच, संस्थेची घसरलेली आर्थिक आणि प्रशासकीय स्थिती सुधारण्यासाठी पूर्वी प्रभावी कामगिरी करणाऱ्या अनुभवी सनदी अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्याचाही त्यांनी आग्रह धरला.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सरकार हा विषय अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे स्पष्ट केले. हाफकिनमधील लस निर्मितीचे काम तातडीने पूर्ववत करण्यासाठी आठ दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल आणि संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सभागृहात जाहीर केले.
हाफकिनमधील लस निर्मिती पुन्हा सुरू झाल्यास राज्यासह देशातील पोलिओ प्रतिबंधक लसींचा पुरवठा सुरळीत होण्याबरोबरच सर्पदंशासारख्या गंभीर आपत्कालीन उपचारांसाठी आवश्यक जीवनरक्षक लसींची उपलब्धताही सुनिश्चित होणार असल्याने सरकारच्या आगामी निर्णयाकडे आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


