सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कार्यक्षमतेला अधिक बळ देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मोठा अंतर्गत फेरबदल केला आहे. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार तब्बल ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी देण्यात आली असून, जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये नवीन प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे पोलीस प्रशासनात अधिक गतिमानता, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या व्यापक फेरबदलात सात महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना नवीन पोलीस निरीक्षक (पीआय) मिळाले आहेत, तर एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच गुन्हे नियंत्रण, तपासाची गुणवत्ता आणि नागरिकाभिमुख पोलीस सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सात पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी
या आदेशानुसार महेंद्र जगताप यांची खंडाळा पोलीस ठाण्यात, घनश्याम बल्लाळ यांची फलटण शहर पोलीस ठाण्यात, अरुण देवकर यांची कोरेगाव पोलीस ठाण्यात, प्रदीप सूर्यवंशी यांची वाई पोलीस ठाण्यात, शितलकुमार कोल्हाळ यांची कराड तालुका पोलीस ठाण्यात, महेश इंगळे यांची शिरवळ पोलीस ठाण्यात आणि हर्षद गालिंदे यांची महाबळेश्वर पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बापूसाहेब सांडभोर यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
एपीआय स्तरावरही मोठे फेरबदल
सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) स्तरावरही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. राजेश माने यांची सातारा शहर वाहतूक शाखेत, अभिजित यादव यांची स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी), अभिजित चौधरी यांची कराड शहर, प्रकाश भुजबळ यांची कराड तालुका, निलेश तारू यांची पाटण, राजेश माळी यांची सायबर पोलीस ठाणे, रघुनाथ शिंदे यांची कोरेगाव, चंद्रहार पाटील यांची सातारा तालुका, भाऊसाहेब गोसावी यांची दहिवडी, संदीप साळुंखे यांची कराड शहर वाहतूक शाखा, प्रदीप जाधव यांची वाई, संदीप गोसावी यांची सातारा शहर आणि सुनील जानकर यांची औंध पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
उपनिरीक्षकांच्या बदल्या; काहींना मुदतवाढ
पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) स्तरावरही अनेक बदल करण्यात आले असून, काही अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदस्थापनेवर मुदतवाढ देण्यात आली आहे. सतीश दत्तात्रय मयेकर (औंध) यांना मुदतवाढ देण्यात आली असून, रमेश पंडीत ठाणेकर (उंब्रज) यांना ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. कृष्णा केशव डिसले (कराड शहर), अनिल सावळाराम जायपत्रे (सातारा शहर) आणि प्रिया गंगाराम पाटील (कराड शहर) यांनाही एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
याशिवाय अविनाश श्रीकांत गवळी (उंब्रज), सचिन दगडू भिलारी (पाटण), राजेंद्र अंकुश सदगर (वडूज), अमित शरद शिंदे (म्हसवड), शितल शरद माने (खंडाळा), अयोध्या प्रकाश घोरपडे (उंब्रज), दिपीका दिलीप मुसळे (सातारा शहर), ज्योती गोविंद बैनवाड (मानवी तस्करी प्रतिबंधक कक्ष), शरद नारायण देसाई (नियंत्रण कक्ष) आणि चंद्रकांत परशराम पुजारी (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या बदल्यांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे आदेश
बदली झालेल्या सर्व ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न करता तातडीने आपल्या नव्या पदस्थापनेचा कार्यभार स्वीकारावा आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश आदेशात देण्यात आले आहेत.
या व्यापक प्रशासकीय फेरबदलामुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम नेतृत्व मिळणार असून, कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना जलद व परिणामकारक सेवा देण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


