नवी दिल्ली वृत्तसंस्था
जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार आणि तेल विपणन कंपन्यांकडून व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (IOC, BPCL आणि HPCL) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 183.50 रुपयांपर्यंत कपात जाहीर केली आहे. मात्र, सर्वसामान्य ग्राहक वापरत असलेल्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
रेस्टॉरंट, हॉटेल, खानावळ, कॅटरिंग व्यवसाय तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी ही दरकपात मोठा दिलासा मानली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या इंधन खर्चामुळे व्यावसायिक क्षेत्रावर आर्थिक ताण निर्माण झाला होता. नव्या निर्णयामुळे व्यवसायिकांचा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे.
दिल्लीत सर्वाधिक दिलासा
इंडियन ऑइलने जाहीर केलेल्या सुधारित दरानुसार, दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 3,113.50 रुपयांवरून 183.50 रुपयांनी कमी होऊन 2,930 रुपये झाली आहे. कोलकाता, मुंबई, चेन्नई, लखनौ आणि पाटणा यांसह देशातील विविध शहरांमध्येही दरात कपात करण्यात आली असून, शहरानुसार ही कपात वेगवेगळी आहे.
पाटण्यात व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 3,227 रुपये झाली असून, घरगुती 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,031.50 रुपये इतकी कायम ठेवण्यात आली आहे.
घरगुती ग्राहकांना दिलासा नाही
सर्वसामान्य नागरिकांना मात्र यावेळी कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतीही कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागील महिन्यात लागू असलेले दरच कायम राहणार आहेत.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दरांचा आढावा
तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, डॉलर-रुपया विनिमय दर आणि इतर आर्थिक घटकांचा विचार करून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरचे दर निश्चित करतात. त्यानुसार यावेळी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली असली तरी घरगुती ग्राहकांना प्रतीक्षा कायम ठेवावी लागणार आहे.
व्यवसायिकांना होणार फायदा
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात झालेल्या कपातीमुळे हॉटेल, उपाहारगृहे, ढाबे, मिठाई दुकाने, कॅटरर्स आणि खाद्य व्यवसायाशी संबंधित उद्योगांचा इंधन खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. याचा काही प्रमाणात खाद्यपदार्थांच्या उत्पादन खर्चावरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे व्यावसायिक क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.


