ठाणे प्रतिनिधी
राज्यातील दलित चळवळीतील युवा चेहरा म्हणून ओळख असलेले दलित पँथर सेनेचे अध्यक्ष बुद्धभूषण गोटे यांनी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत गोटे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

दलित चळवळीत सातत्याने सक्रिय राहिलेल्या बुद्धभूषण गोटे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला दलित समाजात नव्याने बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
बुद्धभूषण गोटे हे मुंब्रा येथील ज्येष्ठ आंबेडकरी नेते दिवंगत कुंदन गोटे यांचे सुपुत्र असून त्यांनी वडिलांचा सामाजिक आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा पुढे नेला आहे. दलित समाजाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत संघटनात्मक काम केले आहे. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून युवकांमध्येही त्यांचे प्रभावी नेतृत्व मानले जाते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गोटे यांचे पक्षात स्वागत करताना, त्यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाकडून त्यांच्यावर लवकरच महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येणार असून राज्यभर पक्षविस्तारासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षप्रवेशानंतर बोलताना बुद्धभूषण गोटे म्हणाले की, “शरद पवार आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या पुरोगामी, संविधानवादी आणि सर्वसमावेशक विचारांवर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकरी समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि क्षमता या नेतृत्वामध्ये असल्याचा मला विश्वास आहे. सामाजिक न्याय, समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा माझा संकल्प आहे.”
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुद्धभूषण गोटे यांचे शेकडो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात गोटे यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
राज्यातील दलित समाजातील सक्रिय नेतृत्व म्हणून बुद्धभूषण गोटे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सामाजिक समीकरणांना नवी धार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये या पक्षप्रवेशाकडे विशेष लक्ष लागले आहे.


