नागपूर प्रतिनिधी
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी तथा नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या एका सार्वजनिक भाषणावरून राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वादानंतर त्यांनी प्रथमच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय संविधानाशी आपली संपूर्ण निष्ठा असून, आपण केलेले भाषण कायद्याच्या चौकटीत राहूनच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
नवी मुंबईतील सांपाडा येथे ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याचा उल्लेख करत गौरवोद्गार काढल्याने नांगरे-पाटील यांच्यावर काँग्रेससह विरोधी पक्षांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूर पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या वादावर स्पष्टीकरण दिले.
“भारतीय संविधानातील मूल्यांशी आम्ही बांधील”
नांगरे-पाटील म्हणाले, “मी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहे. माझी निष्ठा भारतीय संविधानाशी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या घटनात्मक मूल्यांबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. कायद्याची अंमलबजावणी करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असली तरी समाजात जनजागृती, प्रबोधन आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हेही पोलीस दलाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे.”
आपल्या भाषणाचा काही भाग वेगळ्या संदर्भात मांडला जात असल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण भाषण पाहिल्यास त्यामागील उद्देश स्पष्ट होईल, असेही नमूद केले.
“सर्व धर्मांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिलो”
वादग्रस्त ठरलेला कार्यक्रम १९ एप्रिल रोजी ‘सकल हिंदू समाज, सांपाडा’ यांच्या निमंत्रणावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात योग, करप्रणाली, अध्यात्म आदी विषयांवर विविध मान्यवरांची व्याख्याने झाली होती. हा कार्यक्रम सर्व समाजघटक आणि कुटुंबांसाठी खुला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन दशकांतील पोलीस सेवेत आपण रमजान ईद, इफ्तार, जैन, बौद्ध, ख्रिश्चन तसेच विविध समाजांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना नियमित उपस्थित राहत आलो असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणी सामाजिक ऐक्य, नैतिक मूल्ये, कायद्याचे पालन आणि युवकांचे प्रबोधन याच विषयांवर मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी नमूद केले.
“सर्व धर्मांमध्ये एकाच परमेश्वराची उपासना”
आपल्या भाषणातील आशय स्पष्ट करताना नांगरे-पाटील म्हणाले की, विविध धर्मांमध्ये एकाच परमेश्वराची उपासना वेगवेगळ्या स्वरूपात केली जाते, हा विचार त्यांनी मांडला होता. तसेच उपनिषदांतील शांतिमंत्र, ज्ञानेश्वरीतील विश्वबंधुत्व, परस्पर प्रेम, सेवा, व्यसनमुक्ती, युवकांचे चारित्र्य संवर्धन आणि कायद्याचे पालन यांसारख्या विषयांवर भाष्य केले होते.
“माझ्या भाषणाची संपूर्ण चित्रफीत उपलब्ध आहे. ती पाहिल्यास माझ्या वक्तव्याचा मूळ संदर्भ स्पष्ट होईल. माझ्या बोलण्याचा कोण काय अर्थ लावतो, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. मात्र मी कोणत्याही सेवा नियमांचे किंवा कायद्याचे उल्लंघन केलेले नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
वादाची पार्श्वभूमी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात नांगरे-पाटील यांनी केलेल्या भाषणातील काही विधानांवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसने एका सनदी अधिकाऱ्याने अशा प्रकारची भूमिका घेणे योग्य नसल्याचा आक्षेप नोंदवला होता. या सर्व घडामोडींनंतर नांगरे-पाटील यांनी संविधाननिष्ठा, कायद्याचे पालन आणि सामाजिक सलोखा या मूल्यांशी आपण कायम बांधील असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.


