नवी दिल्ली वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मंत्रिमंडळाची नव्याने मांडणी होऊ शकते, अशी जोरदार चर्चा असून अनेक वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल, काही नव्या चेहऱ्यांना संधी आणि काही विद्यमान मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
विशेष म्हणजे, या संभाव्य फेरबदलात महाराष्ट्रालाही प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव संभाव्य केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळातही या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
धर्मेंद्र प्रधानांचे शिक्षण खाते जाणार?
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर विरोधकांसह विविध विद्यार्थी संघटनांकडून जोरदार टीका झाली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चर्चेनुसार, सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते, तर धर्मेंद्र प्रधान यांच्या खात्यात बदल अथवा त्यांना इतर जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
शक्तिकांत दास होणार नवे अर्थमंत्री?
संभाव्य फेरबदलातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी शक्तिकांत दास यांचे नाव. अर्थव्यवस्था आणि वित्तीय क्षेत्रातील त्यांचा दीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होऊ शकते, अशी चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जर ही नियुक्ती झाली, तर आरबीआयचे गव्हर्नरपद भूषवल्यानंतर देशाचे अर्थमंत्री बनणाऱ्या मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होईल. याआधी सी. डी. देशमुख आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी ही दोन्ही महत्त्वाची पदे भूषवली होती.
सध्या शक्तिकांत दास हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. संविधानानुसार मंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्यत्व घ्यावे लागेल. त्यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आठ अर्थसंकल्पांचा अनुभव
शक्तिकांत दास यांनी अर्थ मंत्रालयात कार्यरत असताना आठ केंद्रीय अर्थसंकल्पांच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच २०१८ ते २०२४ या कालावधीत आरबीआयचे गव्हर्नर म्हणून त्यांनी कोरोना महामारी, जागतिक आर्थिक मंदीचा धोका आणि महागाईसारख्या आव्हानांचा सामना करत आर्थिक स्थैर्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली असून त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि सर्वोच्च दर्जाचे मूल्यांकन मिळाले आहे.
कोणाची लागणार वर्णी?
संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास, माजी तृणमूल काँग्रेस नेते सुखेंदू शेखर राय, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ, पंजाबमधील राघव चड्ढा, महाराष्ट्राचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
‘या’ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल?
सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, रवनीत सिंग बिट्टू, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी यांच्या खात्यांमध्ये फेरबदल होऊ शकतो. काहींना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, तर काहींना संघटनात्मक कामकाजाची जबाबदारीही दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंजाब आणि उत्तर प्रदेशवर विशेष लक्ष
२०२७ मध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊनही मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये शीख मतदारांपर्यंत अधिक प्रभावी पोहोच निर्माण करण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.
सध्याचे केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांच्याकडे पंजाबमधील राजकीय जबाबदारी सोपवली जाऊ शकते, तर हरदीप सिंग पुरी यांच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे.
महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा
महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने श्रीकांत शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांना एनडीएच्या संपर्कात आणण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.
संघाच्या भूमिकेकडेही लक्ष
राजकीय विश्लेषकांच्या मते, या फेरबदलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूचनांनाही महत्त्व दिले जाऊ शकते. भाजप आणि संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये नुकतीच झालेली बैठक, आगामी विधानसभा निवडणुका आणि संघटनात्मक रणनीती लक्षात घेऊन मंत्रिमंडळाची नव्याने मांडणी केली जाऊ शकते. त्यामुळे आगामी काही दिवसांत दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत अद्याप पंतप्रधान कार्यालय किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या चर्चेत असलेली सर्व नावे आणि खातेबदल हे राजकीय वर्तुळातील शक्यतांवर आधारित असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे.


