मुंबई प्रतिनिधी
राज्यात २८ जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीमुळे ऐनवेळी पुढे ढकलावी लागल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाण्याचे सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) गठित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संपूर्ण रॅकेटचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तीन आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे चार संच, मोबाईल फोन, डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले. प्राथमिक चौकशीत जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका ही मूळ प्रश्नपत्रिकाच असल्याची खात्री महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून पुढील कार्यवाहीचा आढावा घेतल्याचेही समजते. लाखो उमेदवारांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या प्रकरणात कोणतीही कसूर सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे.
बहुराज्यीय तपासाला गती
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व पोलीस उपायुक्त पवन बनसोड करणार आहेत. या पथकात दोन सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), नऊ अधिकारी (पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक) तसेच २० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पेपरफुटीमागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी तपास पथकाची विविध राज्यांत स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका दिल्लीतून कशी बाहेर आली, शिक्षण विभागातील किंवा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कोणाचा सहभाग आहे का, प्रश्नपत्रिका आणखी किती जणांना विकण्यात आली आणि या रॅकेटमध्ये इतर कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास आता केला जाणार आहे.
परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून रोजी राज्यभरातील १,०२८ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी पाच लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिकेच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्याचा दावा परीक्षा परिषदेकडून करण्यात आला होता.
मात्र, परीक्षा होण्याच्या अवघ्या काही तास आधी भिवंडी येथे काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिकेची माहिती असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोनगाव पोलिसांनी तातडीने छापेमारी करून आरोपींना ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची पडताळणी केल्यानंतर ती मूळ प्रश्नपत्रिकाच असल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
दीड कोटी रुपयांत पेपर विक्रीचा कट
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी प्रश्नपत्रिका विक्रीसाठी तब्बल दीड कोटी रुपयांची आगाऊ रक्कम मागितली होती. त्यानंतर ही प्रश्नपत्रिका विविध रकमेच्या बदल्यात परीक्षार्थींना विकण्याची तयारी सुरू होती. या व्यवहारामागे मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याच दृष्टीने तपास सुरू आहे.
तिन्ही आरोपी परराज्यातील
अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणातील, तर दोन आरोपी बिहारमधील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे तिघेही दिल्लीहून प्रश्नपत्रिका घेऊन भिवंडीत आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका गळतीचे मूळ राज्याबाहेर असल्याची शक्यता बळावली असून तपास यंत्रणा त्या दिशेनेही तपास करत आहे.
दरम्यान, पेपरफुटीमुळे लाखो उमेदवारांची मेहनत वाया गेल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात संपूर्ण रॅकेट उघड करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी उमेदवार आणि विविध संघटनांकडून करण्यात येत आहे.


