मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या भायखळा परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला असून मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांना विष देऊन मारण्याचा एक भयानक कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. मिरवणुकीतील गर्दीला ‘पेन किलर’ आणि ‘चॉकलेट’ असल्याचं सांगून चक्क उंदीर मारण्याचं घातक औषध वाटण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली असून या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे ११ ते १२ तरुणांची प्रकृती बिघडली आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी मुख्य आरोपीला रंगेहात अटक केली आहे. पोलीस चौकशीत आरोपीने “मला कमीत कमी १५ हजार लोकांना मारायचं होतं,” अशी खळबळजनक कबुली दिल्यामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे.
भायखळा परिसरात मोहरमची मिरवणूक सुरू असताना मुंबई पोलिसांना एक संशयित व्यक्ती तिथे लोकांना कॅप्सूल वाटप करताना आढळली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने या वेदनाशामक (पेन किलर) गोळ्या असल्याचा दावा केला, परंतु कोणतीही परवानगी न घेता तो अशा प्रकारच्या कॅप्सूल वाटत असल्याने पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ त्याचा संपूर्ण साठा जप्त करत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीचे नाव फय्याज निसार हुसेन प्रेमजी असल्याचे समोर आले असून त्याने पोलिसांसमोर आपला भयानक डाव कबूल केला. फयाजने सांगितले की, मिरवणुकीला टार्गेट करून त्याला किमान १५ हजार लोकांना जीवे मारायचे होते, यासाठी त्याने काही गोळ्या चॉकलेट म्हणून हवेत उधळल्या तर काही गोळ्या पेन किलर म्हणून लोकांना दिल्या.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फयाजने उंदीर मारण्याच्या गोळ्यांमध्ये वापरले जाणारे अत्यंत घातक रसायन ‘झिंक फॉस्फाईड’ तब्बल ५० किलो मागवले होते. तो गेल्या काही दिवसांपासून आपल्या राहत्या घरी प्रत्येक कॅप्सूलमध्ये १-१ ग्रॅम विष टाकून या जीवघेण्या कॅप्स्युल्स स्वतः तयार करत होता. त्याचे एकूण ३० हजार कॅप्स्युल्स तयार करण्याचे लक्ष्य होते, मात्र मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी त्याच्याकडून १४ हजार ९०० तयार कॅप्स्युल्स जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी फयाजने २०२५ मध्ये इराण आणि इराकचा प्रवास केला होता, त्यामुळे या कटामागे काही मोठे नेटवर्क आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान, त्याने वाटलेल्या गोळ्या खाल्ल्यामुळे ११ ते १२ जणांना विषबाधा झाली असून ३ जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाला आहे, तर उर्वरित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.


