लातूर प्रतिनिधी
जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर देत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्व शासकीय यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ६१२ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली.
बैठकीला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव उपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार रमेश कराड यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला. प्रारंभी माजी खासदार डॉ. जनार्धन वाघमारे आणि डॉ. गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ विकासकामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. निधीचा प्रभावी वापर करत विकासकामांच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्यावर त्यांनी भर दिला.
‘गाव तेथे स्मशानभूमी’ अभियानावर भर
‘गाव तेथे स्मशानभूमी’ अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देताना, ज्या गावांमध्ये जागेची उपलब्धता नाही तेथे भूसंपादनाद्वारे जमीन मिळविण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
शाळांमधील मूलभूत सुविधांना प्राधान्य
जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे, वीज जोडणी, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांच्या पुनर्बांधणीस प्राधान्य देण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे सांगण्यात आले.
‘पीएम सूर्यघर’ आणि निधी वापराबाबत स्पष्ट सूचना
‘पीएम सूर्यघर’ योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयांचे प्रस्ताव महाऊर्जामार्फत तातडीने मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्हा विकास आराखड्यातील निधी कोणत्याही परिस्थितीत इतर योजनांकडे वळवू नये, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्र्यांनी केली.
वाहतूक कोंडीवर संयुक्त कारवाई
लातूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महानगरपालिका यांनी संयुक्तपणे उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले. विशेषतः गंजगोलाई परिसरातील अतिक्रमणे हटविणे आणि बेशिस्त वाहनतळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पाणी, शेती आणि वीज प्रश्नांवर चर्चा
यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पुरेसा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्लाही देण्यात आला. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा लाभ कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.
महावितरणकडील प्रलंबित तक्रारी, अपुरे मनुष्यबळ तसेच मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेच्या कामांना गती देण्याची आवश्यकता यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
५७७.२३ कोटींच्या खर्चाला मान्यता
बैठकीत मागील आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या ५७७.२३ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. याशिवाय २०२६-२७ या वर्षासाठी ६१२ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यालाही समितीने हिरवा कंदील दिला. विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीच्या समारोपावेळी केले.


