मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारने सोमवारी प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचे फेरबदल करत भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) तसेच भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या फेरबदलांत संजीव कुमार यांची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून विक्रम कुमार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी (महापारेषण)च्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पी. वेलारासू यांची वन विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. मात्र वन विभागातील भारतीय वन सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयएफएस अधिकाऱ्यांपेक्षा कनिष्ठ सेवाज्येष्ठता असलेल्या अधिकाऱ्यांना सचिव म्हणून अहवाल देण्याबाबत आक्षेप घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांची नियुक्ती बदलून त्यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषीकेश रंजन यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ येथे बदली करण्यात आली असून नरेश झुरमुरे (१९९६ बॅच) यांची प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच पी. कल्याणकुमार (१९९७ बॅच) यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक), नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. रविकिरण गोवेकर (२००१ बॅच), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष), मुंबई यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पश्चिम), मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.
वन विभागातील इतर बदल्यांमध्ये चंद्रशेखर बाळा एन. यांची वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प (अमरावती), टी. ब्युला एलिल यांची महाव्यवस्थापक (औषधी वनस्पती), महाराष्ट्र वन विकास महामंडळ, नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल पाटील यांना उपवनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन), वन्यजीव विभाग, नागपूर येथे तर विनोद शिवकुमार यांना उपवनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय कुशाग्र पाठक यांची प्रादेशिक व्यवस्थापक, एफडीसीएम लिमिटेड, नागपूर, विजय माने यांची उपवनसंरक्षक (कार्य आयोजना), चंद्रपूर, महादेव मोहिते यांची उपवनसंरक्षक, पुणे, उमेश वावरे यांची उपवनसंरक्षक, अलिबाग तसेच किर्ती दादासाहेब जमदाडे यांची उपवनसंरक्षक (कार्य आयोजना), अमरावती येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, विविध विभागांतील नेतृत्वाला नवी दिशा देणे आणि प्रलंबित प्रशासकीय पुनर्रचना पूर्ण करणे या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी काळात आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


