सांगली: प्रतिनिधी
सांगली शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी एक अत्यंत भयंकर घटना समोर आली आहे. भरवस्तीत असलेल्या स्थानिक माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी घुसून अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात बंडगर यांचा १४ वर्षांचा नातू वेदांत मारुती बंडगर याचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला आहे.
सांगलीतील संजयनगर परिसरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही थरारक घटना घडली. बाळासाहेब बंडगर यांच्या घरात अचानक शिरलेल्या चार ते पाच सशस्त्र मारेकऱ्यांनी आधी दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर घरात उपस्थित असलेल्यांवर थेट गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात वेदांत बंडगर याच्या शरीरात गोळ्या लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या व्यावसायिक वादातून किंवा वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. परिसरात तणाव निर्माण झाल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याभर नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांची विविध पथके आरोपींच्या मागावर रवाना झाली आहेत.
वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आपला १४ वर्षांचा मुलगा हिरावल्याने बंडगर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईक आणि मित्रपरिवाराने एकच आक्रोश केला. भरवस्तीत झालेल्या या क्रूर हत्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या घटनेचे पडसाद स्थानिक राजकारण आणि व्यापारी वर्गात उमटण्याची शक्यता आहे.


