रणजित मस्के, प्रतिनिधी
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या दोन तडीपार आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दोन धारदार लोखंडी कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई मिरज शहर परिसरात करण्यात आली.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिरज शहरातील चुनाभट्टी रोड परिसरात दोन संशयित इसम शस्त्रांसह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांची नावे इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख (वय २१) व मलिकजान उर्फ सोहेल राजू नदाफ (वय २६) अशी असल्याचे निष्पन्न झाले. दोघेही मिरज येथील रहिवासी असून त्यांना यापूर्वी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.
तपासादरम्यान आरोपींकडून दोन लाकडी मुठ असलेले धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार तसेच त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.


