मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारूनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवता न आल्याने अनेक गुणवंत उमेदवारांची स्वप्ने अपूर्ण राहतात. अशा उमेदवारांच्या ज्ञानाचा, कौशल्याचा आणि प्रशासकीय क्षमतेचा राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्योग विभागाच्या माध्यमातून ‘निपुण सेतू’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यास तसेच त्यासाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल विकसित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेतात. प्राथमिक आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत मुलाखतीपर्यंत पोहोचणारे अनेक उमेदवार अत्यंत कमी गुणांच्या फरकाने अंतिम निवडीपासून वंचित राहतात. शासनातील रिक्त पदांची संख्या मर्यादित असल्याने सर्व पात्र उमेदवारांना संधी मिळणे शक्य होत नाही. परिणामी, शैक्षणिक पात्रता, विश्लेषण क्षमता, नेतृत्वगुण आणि प्रशासकीय समज असलेल्या उमेदवारांना रोजगारासाठी नव्याने संघर्ष करावा लागतो.
याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या १३ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीत ‘निपुण सेतू’ उपक्रमास मंजुरी देण्यात आली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उद्योग विभागाने पुढाकार घेतला असून ‘एक खिडकी मैत्री २.०’ (MAITRI 2.0) या पोर्टलअंतर्गत स्वतंत्र ‘निपुण सेतू’ पोर्टल विकसित करण्यात येणार आहे.
गुणवंत उमेदवार आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा
या पोर्टलच्या माध्यमातून एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या, मात्र अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवू न शकलेल्या उमेदवारांची माहिती उद्योग क्षेत्राला उपलब्ध करून दिली जाणार आहे. कॉर्पोरेट कंपन्या, खासगी उद्योजक, शासकीय महामंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना त्यांच्या गरजेनुसार सक्षम व प्रशिक्षित मनुष्यबळ निवडणे सुलभ होणार आहे.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीतून घडलेले हे उमेदवार निर्णयक्षमता, प्रशासकीय समज, विश्लेषण कौशल्य आणि नेतृत्वगुण यांसाठी ओळखले जातात. त्यामुळे अशा उमेदवारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देतानाच उद्योग क्षेत्रालाही गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे.
उमेदवारांची कोणती माहिती उपलब्ध होणार?
नियोक्त्यांना योग्य उमेदवारांची निवड करता यावी यासाठी पोर्टलवर केवळ आवश्यक आणि मर्यादित माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामध्ये –
– उमेदवाराचे पूर्ण नाव आणि जन्मवर्ष
– शैक्षणिक पात्रता, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाची माहिती
– विशेष प्राविण्य किंवा अतिरिक्त कौशल्ये
– पूर्वीचा कामाचा अनुभव (असल्यास)
– संबंधित एमपीएससी परीक्षेचे नाव
– अंतिम टप्प्यात प्राप्त झालेले गुण
यांचा समावेश असेल.
गोपनीयतेची विशेष काळजी
उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेसाठीही शासनाने विशेष तरतूद केली आहे. उमेदवारांचे ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सर्वसामान्यांसाठी उपलब्ध राहणार नाहीत. ही माहिती केवळ अधिकृत आणि नोंदणीकृत नियोक्त्यांनाच पाहता येईल. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतानाच गोपनीयतेचे संरक्षणही सुनिश्चित केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये समाधान
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एमपीएससीच्या तयारीत वर्षानुवर्षे मेहनत घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अंतिम निवड न झाल्यास करिअरच्या संधी मर्यादित राहतात, अशी भावना अनेक उमेदवारांमध्ये होती. ‘निपुण सेतू’च्या माध्यमातून त्यांना खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार असून त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले ज्ञान आणि कौशल्य वाया न जाऊ देता त्याचा राज्याच्या विकासासाठी उपयोग करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे ‘निपुण सेतू’ हा केवळ रोजगार उपलब्ध करून देणारा उपक्रम नसून, गुणवंत युवक आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सक्षम दुवा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


