पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून १३ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
जिल्ह्यातील शांतता, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या आदेशानुसार दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, तलवारी, काठ्या, भाले, बंदुका तसेच इतर कोणतीही इजा पोहोचवू शकणारी साधने जवळ ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने आक्षेपार्ह किंवा अर्वाच्य घोषणा देणे, प्रक्षोभक घोषणाबाजी करणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन अथवा दहन करणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय समाजात तणाव निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा प्रकारची आवेशपूर्ण भाषणे, चिथावणीखोर वक्तव्ये किंवा सार्वजनिक कार्यक्रमांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा आयोजित करणे किंवा मिरवणुका काढणे यास मनाई करण्यात आली आहे.
अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हा आदेश शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही. तसेच कायदेशीर परवानगी असलेले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची आवश्यक परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


