मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि वैयक्तिक वाहनांवरील वाढते अवलंबित्व कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केलेल्या ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’ उपक्रमाला पहिल्याच दिवशी अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. दर शुक्रवारी बीकेसीत सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असले, तरी बहुतांश कर्मचारी आणि नागरिकांनी नेहमीप्रमाणेच दुचाकी व चारचाकी वाहनांचा पर्याय निवडल्याचे दिसून आले.
बीकेसीमध्ये दररोज सुमारे दोन लाखांहून अधिक कर्मचारी, व्यावसायिक, अधिकारी आणि नागरिक विविध कामांसाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यासोबतच वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि इंधनाचा वाढता वापर यावर उपाय म्हणून एमएमआरडीएने प्रत्येक शुक्रवारी ‘स्वैच्छिक सार्वजनिक वाहतूक दिन’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांनी मेट्रो, लोकल रेल्वे, बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सी यांसारख्या सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करून बीकेसीत यावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात बीकेसीतील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणेच कायम राहिल्याचे दिसून आले. काही प्रमाणात वाहनांची संख्या कमी झाल्याचे जाणवत असले तरी एकूणच उपक्रमाचा प्रभाव मर्यादित राहिला.
सार्वजनिक वाहतूक अपुरी; नागरिकांची नाराजी
बीकेसीतील अनेक कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास असमर्थता व्यक्त केली. कुर्ला आणि वांद्रे रेल्वे स्थानकांपासून बीकेसीतील विविध कार्यालये लांब अंतरावर आहेत. मेट्रो-३ मार्गिकेचे स्थानक उपलब्ध असले तरी अनेक कार्यालये आणि व्यावसायिक संकुले स्थानकापासून बरीच दूर असल्याने नागरिकांना पुढील प्रवासासाठी रिक्षा किंवा टॅक्सीवर अवलंबून राहावे लागते.
त्यामुळे वेळ, खर्च आणि गैरसोय लक्षात घेता अनेक कर्मचारी स्वतःची वाहने वापरणे अधिक सोयीचे असल्याचे सांगत होते. “सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवायचा असेल तर प्रथम शेवटच्या टप्प्यापर्यंतची (लास्ट माईल कनेक्टिव्हिटी) व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे,” असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले.
संस्थांचा प्रतिसाद; पण प्रत्यक्ष सहभाग मर्यादित
एमएमआरडीएच्या आवाहनाला बीकेसी प्रॉपर्टीज असोसिएशन, सेबी, नमन ग्रुप, डायमंड मार्केटसह काही प्रमुख संस्था आणि कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात कर्मचारी वैयक्तिक वाहनांमधूनच कार्यालयात पोहोचल्याचे दिसून आले.
एमएमआरडीएचे अधिकारी आणि कर्मचारी मात्र सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात दाखल झाले. तसेच बीकेसीतील केंद्र सरकारच्या कार्यालयांनाही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. काही कार्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सुरक्षा कारणास्तव सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
‘लास्ट माईल’चा प्रश्न कायम
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्वात मोठी अडचण म्हणजे ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. रेल्वे स्थानक किंवा मेट्रो स्टेशनपर्यंतचा प्रवास सुलभ असला तरी तेथून कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना रिक्षा किंवा टॅक्सीवर अवलंबून राहावे लागते. त्यातही अवाजवी भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे येत आहेत.
याच संदर्भात टिळक नगर रेल्वे स्थानक परिसरातील एक अनुभवही चर्चेचा विषय ठरला. बीकेसीला जाण्यासाठी विचारणा केल्यानंतर एका रिक्षाचालकाने तब्बल ३०० रुपये भाडे मागितल्याचा आरोप प्रवासी प्रतिक शिंदे यांनी केला. मीटरने जाण्यास स्पष्ट नकार देत संबंधित रिक्षाचालकाने शेअर रिक्षाचा पर्याय सुचवला आणि प्रत्येक प्रवाशाकडून २०० रुपये आकारण्याची तयारी दर्शवली. अशा प्रकारच्या अनुभवांमुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा उत्साह कमी होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त बीकेसीचे उद्दिष्ट
बीकेसी हे देशातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपैकी एक मानले जाते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, बँका, कॉर्पोरेट कार्यालये आणि सरकारी संस्था येथे कार्यरत आहेत. वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्या तीव्र होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एमएमआरडीएने सुरू केलेला हा उपक्रम दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचा असला तरी त्याला यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे, बससेवा वाढवणे, मेट्रो स्थानकांपासून कार्यालयांपर्यंत शटल सेवा उपलब्ध करणे आणि रिक्षा-टॅक्सी भाडे नियंत्रणात ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पहिलाच दिवस; पुढे प्रतिसाद वाढेल : महानगर आयुक्त
“आजच्या उपक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून बीकेसीत पोहोचलेल्या सर्वांचे मनापासून आभार. हा उपक्रमाचा पहिलाच दिवस होता. अनेकांना याबाबत पुरेशी माहिती नव्हती. आगामी काळात जनजागृती वाढवून अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्यात येईल. त्यामुळे पुढील शुक्रवारी या उपक्रमाला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
टिळक नगर ते बीकेसी – ३०० रुपयांचे रिक्षाभाडे!
बीकेसीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय अद्याप कायम असल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. टिळक नगर रेल्वे स्थानकाबाहेर बीकेसीसाठी विचारणा केल्यानंतर एका रिक्षाचालकाने ३०० रुपये भाड्याची मागणी केली. मीटरने जाण्यास नकार देत शेअर रिक्षासाठीही प्रत्येक प्रवाशाकडून २०० रुपये आकारण्याची तयारी दर्शवण्यात आली. सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्यांसाठी अशा प्रकारचे अनुभव मोठा अडथळा ठरत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली.


