स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
ओशिवरा पोलीस ठाण्यात 2004 मध्ये नोंद झालेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पिटा अॅक्ट) अंतर्गत गंभीर गुन्ह्यातील २२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली. राजेंद्र शिवराम शिंदे (वय 49) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणात माझगाव सत्र न्यायालयाने आरोपीविरुद्ध स्थायी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध स्तरांवर तपास सुरू ठेवला होता. आरोपीच्या नोंद असलेल्या पत्त्यावर चौकशी केली असता संबंधित झोपडपट्टी परिसर 2012-13 मध्ये पुनर्विकासासाठी हटविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता.
दरम्यान, गुप्त माहितीदारामार्फत आरोपीने 2005 मध्ये आपली खोली विकून अन्यत्र स्थलांतर केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर निगराणी पथकाने विविध माध्यमांतून माहिती गोळा करून आरोपी विलेपार्ले परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानुसार गोपनीय पाळत ठेवण्यात आली. 3 जून 2026 रोजी संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तोच या गुन्ह्यातील फरार आरोपी राजेंद्र शिवराम शिंदे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अटक आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी माझगाव न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक तुषार बाविस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील साळुंखे, पोलीस हवालदार महेश साळोखे आणि पोलीस शिपाई महेंद्र भोये यांनी केली.


