पुणे प्रतिनिधी
विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी सोहळा २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी येत असून, त्याआधी दोन्ही पालख्या पारंपरिक मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा मानल्या जाणाऱ्या या वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक सहभागी होतात. टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंगांच्या स्वरांत आणि “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषात निघणाऱ्या पालखी सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते.
तुकाराम महाराज पालखीचे ७ जुलैला देहूतून प्रस्थान
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ७ जुलै २०२६ रोजी देहू येथून होणार आहे. प्रस्थानानंतर पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाडा येथे असेल. त्यानंतर आकुर्डी मार्गे पालखी पुण्यात दाखल होणार असून, पुण्यातील नाना पेठ येथील श्री विठ्ठल मंदिरात मुक्काम असेल.
यानंतर पालखीचा पारंपरिक प्रवास हडपसर, लोणी काळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज आणि माळशिरस मार्गे पुढे सुरू राहणार आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पालखी पंढरपुरात दाखल होणार असून, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ८ जुलैला आळंदीहून रवाना
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथून होणार आहे. सुमारे १७ दिवसांच्या या पायी प्रवासात पालखी २४ जुलै रोजी पंढरपुरात पोहोचेल. या काळात चार गोल रिंगण आणि तीन उभे रिंगण सोहळे पार पडणार असून, ते वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षण असतात.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मुक्काम
८ जुलै – आळंदी (प्रस्थान व मुक्काम)
९ व १० जुलै – पुणे
११ व १२ जुलै – सासवड
१३ जुलै – जेजुरी
१४ जुलै – वाल्हे
१५ जुलै – लोणंद (नीरा स्नान)
१६ जुलै – तरडगाव
१७ जुलै – फलटण
१८ जुलै – बरड
१९ जुलै – नातेपुते
२० जुलै – माळशिरस
२१ जुलै – वेळापूर
२२ जुलै – भंडीशेगाव (बंधूभेट)
२३ जुलै – वाखरी
२४ जुलै – पंढरपूर आगमन
यानंतर २५ ते २८ जुलैदरम्यान पालखी पंढरपुरात मुक्कामी राहणार असून, २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.
रिंगण सोहळ्यांकडे वारकऱ्यांचे विशेष लक्ष
वारीतील रिंगण सोहळे हे भक्तांसाठी अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव मानले जातात. पालखीच्या घोड्याच्या धावण्याने होणाऱ्या या सोहळ्याला हजारो वारकरी उपस्थित राहतात.
रिंगण सोहळ्यांचे वेळापत्रक
१६ जुलै – पहिले उभे रिंगण (चांदोबाचा लिंब, तरडगावजवळ)
२० जुलै – पहिले गोल रिंगण (पुरंदवडे, माळशिरस)
२१ जुलै – दुसरे गोल रिंगण (खुडूस फाटा, वेळापूर)
२२ जुलै – तिसरे गोल रिंगण (ठाकुरबुवांची समाधी, भंडीशेगाव)
२३ जुलै – दुसरे उभे रिंगण (बाजीरावची विहीर, वाखरी)
२४ जुलै – तिसरे उभे रिंगण (इसबावी, पंढरपूर प्रवेशावेळी)
प्रशासनाची तयारी सुरू
वारी सोहळ्यासाठी राज्य शासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी तयारी सुरू केली आहे. लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडवणारा हा सोहळा भक्ती, समता आणि एकात्मतेचा संदेश देणार आहे.


