मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरीस उन्हाने अक्षरशः कहर माजवला असून विदर्भ आणि खान्देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४५ ते ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या प्रचंड उष्णतेमुळे अवघ्या २४ तासांत अमरावती, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यात मिळून तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे मृत्यू झालेल्यांमध्ये बेघर, वृद्ध, मजूर आणि दिवसभर उन्हात काम करणाऱ्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अनेक प्रकरणांमध्ये उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अमरावतीत ७ जणांचा मृत्यू; बेघर आणि बेवारस नागरिक सर्वाधिक बळी
अमरावती शहरात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या भागांत तब्बल सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यापैकी दोन जणांचा मृत्यू अधिकृतरीत्या उष्माघाताने झाल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे, तर उर्वरित पाच जणांचा मृत्यू तीव्र उष्णतेमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील ओल्ड कॉटन मार्केट परिसरासह विविध भागांत बेवारस आणि वृद्ध व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्या. प्रचंड उष्णता, शरीरातील पाण्याची कमतरता, सावलीचा अभाव आणि उपासमारीमुळे त्यांची प्रकृती खालावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अमरावतीत सध्या तापमान सातत्याने ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. भारतीय हवामान विभागाने अमरावती आणि अकोला जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इर्विन रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
जळगावात सेंट्रिंग कामगारासह ४ जणांचा मृत्यू
खान्देशातील जळगाव जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून गेल्या महिनाभरापासून तापमान चाळीशीच्या वर कायम आहे. उष्णतेच्या झळांमुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चिंचोली येथील ५७ वर्षीय सेंट्रिंग कामगार केशरलाल दौलत पाटील हे उन्हात काम करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्या मृत्यूची उष्माघात म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याशिवाय ३५ वर्षीय प्रवीण दत्तु मिस्तरी, ३६ वर्षीय श्रीकांत रमेश कोळी आणि ४० वर्षीय नंदू किशोर पाटील या तिघांचाही उलटी, चक्कर, अशक्तपणा आणि उष्माघातासदृश्य लक्षणांमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, दुपारच्या वेळी दीर्घकाळ उन्हात राहणे, शरीरातील पाण्याची कमतरता आणि उष्ण वाऱ्यांचा फटका यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
चंद्रपुरातही उष्णतेचे बळी; तापमान ४७ अंशांच्या वर
विदर्भातील चंद्रपूर जिल्हा सध्या राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांपैकी एक ठरत आहे. येथे तापमान सतत ४७ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भद्रावती तालुक्यात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुरसा गावात एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळून आला, तर भद्रावती शहरातील आंबेडकर चौक परिसरातील पडक्या घरात राहणाऱ्या ६० वर्षीय निराधार महिला पौर्णिमा विक्रम पेटकर यांचाही मृत्यू झाला.
दोघांच्याही मृत्यूमागे तीव्र उष्णता कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने तपास सुरू केला आहे.
प्रशासन सतर्क; उष्माघात कक्ष सुरू
वाढत्या तापमानामुळे आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यातील विविध जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र ‘हीटस्ट्रोक वॉर्ड’ तयार करण्यात आले आहेत.
नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरावे आणि लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तसेच शहरांमधील बेघर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची व्यवस्था करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.
उष्माघाताची लक्षणे कोणती?
उष्माघात झाल्यास नागरिकांमध्ये खालील लक्षणे दिसू शकतात :
अचानक चक्कर येणे
तीव्र डोकेदुखी
उलटी किंवा मळमळ
शरीराचे तापमान वाढणे
घाम येणे बंद होणे
अशक्तपणा आणि बेशुद्धी
अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.


