मुंबई प्रतिनिधी
राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कोकणातील सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामांतरापासून ते डोंबिवलीतील प्राचीन मंदिर ट्रस्टला जमीन देण्यापर्यंत, तसेच नागपूर बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी मुद्रांक शुल्क माफीसारखे निर्णय घेतल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा. परिवहन विभागांतर्गत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समाजवादी नेते स्वर्गीय मधु दंडवते यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कोकणातील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून ही मागणी केली जात होती. आता राज्य सरकारकडून नामांतराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, सामान्य प्रशासन विभागांतर्गत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बदल्यांच्या प्रक्रियेत होणारा विलंब टाळण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
उद्योग विभागाच्या माध्यमातून डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरातील प्राचीन पिंपलेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. मौजे सागाव सोनारपाडा, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथील डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामधील तब्बल ४ एकर २५ गुंठे जमीन मंदिर ट्रस्टला देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या जमिनीवरील मंदिर ट्रस्टचा वापर नियमित करण्यासह नाममात्र दरात जमीन हस्तांतरित करण्यास सरकारने हिरवा कंदील दिला आहे. धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
महसूल व मुद्रांक शुल्क विभागाच्या निर्णयानुसार, नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या खाजगी जमिनींच्या थेट खरेदी व्यवहारांवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे. हिंगणा तालुक्यातील मौजे गोदणी आणि मौजे लाडगाव (रीठी) परिसरातील जमीन या प्रकल्पासाठी खरेदी केली जाणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून, नागपूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयांमुळे कोकण, ठाणे आणि विदर्भ या तिन्ही विभागांमध्ये विकासकामांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या निर्णयामुळे कोकणात राजकीय आणि सामाजिक स्तरावर समाधान व्यक्त केले जात असून, मधु दंडवते यांच्या कार्याला अभिवादन करणारा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.


