नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’च्या वितरण सोहळ्यात यंदा महाराष्ट्राचा विशेष ठसा उमटला. राष्ट्रपती भवनातील भव्य ‘गणतंत्र मंडप’ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील समारंभात महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. कला, उद्योग, सामाजिक कार्य, विज्ञान, कृषी आणि आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी करणाऱ्या या मान्यवरांच्या गौरवामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु ने श्री धर्मेंद्र सिंह देओल (मरणोपरांत) को कला के क्षेत्र में पद्म विभूषण से सम्मानित किया। वे भारतीय सिनेमा के एक विलक्षण व्यक्तित्व रूप में सदैव प्रतिष्ठित रहेंगे। उन्होंने संसद सदस्य के रूप में भी अपनी सेवाएं प्रदान कीं। उनका योगदान छह दशकों से भी… pic.twitter.com/9fxBaEgl3T
— President of India (@rashtrapatibhvn) May 25, 2026
समारंभाला उपराष्ट्रापती सी. पी. राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री Amit Shah अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राजनैतिक अधिकारी, उद्योगपती, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती भवनात पार पडलेला हा सोहळा भावनिक आणि अभिमानास्पद क्षणांनी भरलेला ठरला.
विशेषतः ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीतून भावना व्यक्त होत होत्या. आज त्यांच्या वतीने पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीला अभिवादन केले. सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी सुमारे 300 हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारत भारतीय सिनेमाला नवी ओळख मिळवून दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते.
“गुमनाम लोक कलाकार को सरकार का सम्मान” — पद्म श्री से सम्मानित रघुवीर तुकाराम खेडकर की यह यात्रा भारतीय लोक कला की समृद्ध विरासत को सम्मान देने का प्रतीक है। 🇮🇳
लोक कला के संरक्षण और संवर्धन में उनके योगदान ने हमारी सांस्कृतिक परंपराओं को नई पहचान दी है। उनका यह सम्मान देशभर के… pic.twitter.com/s5rYtAGVNe
— MyGov Hindi (@MyGovHindi) May 25, 2026
उद्योग आणि अर्थक्षेत्रातील योगदानासाठी उदय कोटक यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. एका छोट्या आर्थिक उपक्रमातून सुरुवात करून देशातील अग्रगण्य खासगी बँक उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी मानला जातो. भारतीय बँकिंग क्षेत्रातील आधुनिकीकरण, आर्थिक शिस्त आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी त्यांनी केलेल्या कार्याचा केंद्र सरकारने विशेष गौरव केला.
जाहिरात विश्वातील सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाणारे पियष पांडे यांनाही मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने पत्नी नीता जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. भारतीय जाहिरात क्षेत्रात भावनिक आणि जनसामान्यांशी जोडणाऱ्या मोहिमा साकारून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
दरम्यान, पाच मान्यवरांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील जलसंधारण आणि शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणारे जनार्दन बापुराव बोठे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेद्वारे त्यांनी अनेक गावांतील पाणीटंचाई कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा झेंडा देश-विदेशात फडकावणारे तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. तमाशा या लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करत त्यांनी ग्रामीण संस्कृतीला नवे व्यासपीठ मिळवून दिले. संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला.
परभणीचे प्रयोगशील शेतकरी आणि कृषी संशोधक श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील नवकल्पनांसाठी गौरविण्यात आले. ‘दादा लाड तंत्रज्ञान’ विकसित करून कापूस उत्पादन वाढवण्यास त्यांनी हातभार लावला. तसेच ‘लाल कंधारी’ गाईंच्या संवर्धनासाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
नागपूरस्थित उद्योगपती सत्यनारायण न्युवाल यांना संरक्षण आणि खाणकाम क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला. ‘सोलर इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून डिफेन्स एक्सप्लोझिव्ह क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रयत्नांची दखल केंद्र सरकारने घेतली.
मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर संशोधन क्षेत्रात देशाचे नाव उंचावणारे जुझर वासी यांनाही ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
याशिवाय, पुण्याचे डॉ. रामचंद्र गोडबोले आणि डॉ. सुनीता गोडबोले या दाम्पत्याला संयुक्तपणे ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. गेली तीन दशके त्यांनी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील दुर्गम आदिवासी भागांत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ‘ट्रस्ट फॉर हेल्थ’च्या माध्यमातून त्यांनी कुपोषण, बालमृत्यू आणि आरोग्यविषयक समस्यांवर प्रभावी काम केले असून, हजारो आदिवासी नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे.
यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाचा पहिला टप्पा आज पार पडला असून, देशभरातील एकूण 66 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. केंद्र सरकारने यंदा एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून त्यात पाच पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एकूण पुरस्कारार्थींमध्ये 19 महिला असून 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील या मान्यवरांच्या सन्मानामुळे राज्यभरातून आनंद आणि अभिमान व्यक्त केला जात असून, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना देशपातळीवर मिळालेली ही मोठी दाद मानली जात आहे.


