जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे घडलेल्या अन्सार पिंजारी हत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कठोर कारवाई केली.
या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापुढे निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांवर वेळेवर प्रतिबंधक कारवाई न केल्याचा आणि परिस्थितीची गंभीरता ओळखण्यात अपयश आल्याचा आरोप आहे.
चोरीच्या घटनेतून वाढला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अन्सार पिंजारी यांच्या घरात चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात त्यांनी काही संशयित व्यक्तींची नावे पोलिसांना सांगितली होती. मात्र, संबंधितांविरोधात वेळीच कारवाई करण्यात आली नाही. स्थानिक पातळीवर तणाव वाढत असतानाही पोलिसांनी आवश्यक ती दक्षता घेतली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चोरीच्या संशयावरून सुरू झालेला वाद हळूहळू तीव्र होत गेला आणि अखेर त्याचे रूप निर्घृण हत्येत झाले. अन्सार पिंजारी यांच्या हत्येनंतर बोदवड परिसरात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“वेळीच कारवाई झाली असती तर हत्या टळली असती”
घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून, “पोलिसांनी संशयितांवर वेळेत प्रतिबंधक कारवाई केली असती, तर अन्सार पिंजारी यांचा जीव वाचू शकला असता,” अशी चर्चा सुरू आहे. या प्रकरणामुळे पोलिसांच्या गुप्त माहिती यंत्रणा, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवरील नियंत्रण यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलीस प्रशासनाचा कठोर संदेश
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे समोर आल्यानंतर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईमुळे राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठा संदेश गेला असून, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नात कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्सार पिंजारी हत्या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


