जळगाव प्रतिनिधी
राजकारणातील आक्रमक वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा एक वेगळाच चेहरा जळगावमध्ये पाहायला मिळाला. एका वृद्ध शिल्पकाराच्या कलेचा मान राखत राऊत यांनी क्षणाचाही विलंब न करता खिशातून नोटांचे बंडल काढले आणि सर्जा-राजा बैलजोडीची प्रतिमा विकत घेतली. हा प्रसंग पाहणारे कार्यकर्ते आणि नागरिक काही काळ थक्कच झाले.
जळगाव दौऱ्यावर आलेले राऊत अजिंठा विश्रामगृहातून पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत होते. त्याच वेळी विश्रामगृह परिसरात एक वृद्ध शिल्पकार आपली कलाकृती विक्रीसाठी ठेवून बसलेले होते. सकाळपासून ग्राहकाची वाट पाहत बसलेल्या या शिल्पकाराचे नाव शिरूभाऊ कासार. त्यांच्या हातातील सर्जा-राजा बैलजोडीची प्रतिमा राऊत यांच्या नजरेत भरली.
गाडी पुढे निघाली असतानाच राऊत यांनी चालकाला वाहन थांबवण्यास सांगितले. ते स्वतः गाडीतून उतरले आणि थेट शिल्पकाराजवळ गेले. हातात घेतलेल्या त्या प्रतिमेतील बारकावे, बैलांच्या आकृत्यांतील जिवंतपणा आणि ग्रामीण संस्कृतीची झलक पाहून ते काही क्षण स्तब्धच झाले.
“किती किंमत आहे या प्रतिमेची?” असा प्रश्न त्यांनी शिल्पकाराला विचारला.
शिरूभाऊ कासार यांनी किंमत ८ हजार ५०० रुपये सांगितली. मात्र समोर उभे असलेले राऊत पाहून त्यांनी लगेचच “तुम्ही ५०० रुपये कमी द्या” असे सांगत सवलत दिली.
इतक्यात राऊत यांनी आपल्या खिशात हात घातला आणि ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल बाहेर काढले. नोटा खटाखट मोजत त्यांनी ८ हजार रुपये शिल्पकाराच्या हातात दिले आणि बैलजोडीची प्रतिमा विकत घेतली. हा क्षण पाहताना उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्याही वाजवल्या.
ही प्रतिमा लाकडी चौकटीवर तयार करण्यात आली असून त्यातील बैलांच्या आकृती सिरॅमिक पावडरपासून घडवण्यात आल्या आहेत. ग्रामीण जीवनातील कष्टकरी संस्कृतीचे प्रतीक असलेली ही सर्जा-राजा बैलजोडी शिल्पकाराने अत्यंत बारकाईने साकारली आहे.
प्रतिमा विकल्यानंतर शिरूभाऊ कासार यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. त्यांनी राऊत यांचे आभार मानत वाकून नमस्कार केला. त्या क्षणी वातावरण काहीसे भावुक झाले होते.
राजकारणात कठोर भूमिका घेणारे राऊत या छोट्याशा प्रसंगातून कलाकारांच्या कलेचा सन्मान करणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही समोर आले. जळगाव दौऱ्यातील हा प्रसंग आता राजकीय वर्तुळात आणि सामाजिक माध्यमांवरही चर्चेचा विषय ठरला आहे.


