स्वप्नील गाडे,प्रतिनिधी
मुंबई : मुंबईमध्ये अंमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले असून अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (ANC) वरळी युनिटने चेंबूर परिसरातून तब्बल पावणेचार कोटी रुपयांचे चरस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका तस्कराला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे पावणेचार किलो अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.
शहरात अंमली पदार्थांची खरेदी, विक्री आणि पुरवठा करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांचे विशेष पथक सातत्याने पाळत ठेवून आहे. यादरम्यान चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एक संशयित व्यक्ती अंमली पदार्थांची मोठी खेप घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने तातडीने टिळक नगर परिसरात सापळा रचून पाळत ठेवण्यास सुरुवात केली.
या कारवाईदरम्यान टिळक नगर येथील रेल व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची आणि त्याच्या जवळील बॅगेची कसून झडती घेतली. या झडतीमध्ये त्याच्या बॅगेत तब्बल ३ किलो ८८६ ग्रॅम वजनाचा चरसचा साठा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या चरसची किंमत सुमारे ३ कोटी ८८ लाख रुपये एवढी आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध टिळक नगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर जप्त केलेला हा चरसचा साठा मुंबईत कोठून आणला गेला आणि तो कोणाला पुरवला जाणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या आंतरराष्ट्रीय तस्करीमागे मोठी टोळी असण्याची शक्यता असून पोलीस या पुरवठा साखळीचा कसून शोध घेत आहेत.


