पुणे प्रतिनिधी
विकास लवांडेयांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका कथित फिर्यादीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत लवांडेंनी पुणे पोलिसांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “चोर सोडून संन्याशाला फाशी” अशी बोचरी टीका करत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.
पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी..
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या… pic.twitter.com/mfODGUBIlb— Vikas Lawande (@VikasLawande1) May 21, 2026
लवांडेंनी सोशल मीडियावरील पोस्टमधून आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, “माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड अजूनही मोकाट फिरत आहेत. मात्र कोणताही ठोस पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी पोलिस रात्री थेट घरी पोहोचले. मला फोन करून चौकशीसाठी बोलावले जाऊ शकत होते. पण कुटुंबीयांना घाबरवण्याचा प्रयत्न झाला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“मी फरार नाही, कायद्याचा आदर करणारा माणूस”
लवांडेंनी पुढे म्हटले की, “मी फरार नाही, माफीवीर नाही. मी कायदा पाळणारा नागरिक आहे. पोलिसांनी मला अटक करायची असेल तर जरूर करावी. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र मी कोणताही गुन्हा केलेला नसल्याने जामीन, वकील किंवा दंड भरणार नाही. सत्यासाठी सत्याग्रही पद्धतीने लढणार.”
यावेळी त्यांनी पोलिसांकडून आपल्याला पुण्यातून थेट Wagholi Police Station येथे नेण्यात येत असल्याची माहितीही दिली.
शाईफेक आणि हल्ला प्रकरणाचा संदर्भ
९ तारखेला आपल्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख करत लवांडेंनी सांगितले की, या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. या हल्ल्यामागे संग्राम भंडारेआणि त्याच्या समर्थकांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला.
लवांडेंच्या मते, हल्ल्याच्या आदल्या दिवशी एका भाजप कार्यकर्त्या महिलेने त्यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. “त्या महिलेला मी वैयक्तिकरित्या ओळखतही नाही. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही किंवा असंसदीय भाषा वापरलेली नाही,” असा दावा त्यांनी केला.
“भावना दुखावल्याचा आरोप; पुरावे कुठे?”
“मी नेमके काय बोललो, कोणते विधान केले, ज्यामुळे भावना दुखावल्या गेल्या असा दावा केला जातो, हे पोलिसांनी स्पष्ट करावे. संबंधित पुरावे जनतेसमोर आणावेत,” अशी मागणीही लवांडेंनी केली.
त्यांनी पुढे आरोप केला की, “माझ्यावर हल्ला करणारे आरोपी मोकाट फिरत आहेत. उलट माझ्याविरोधात गुन्हा दाखल करून मला लक्ष्य केले जात आहे. ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी आहे.”
“जेलमध्ये बसेन, पण झुकणार नाही”
लवांडेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी वकील करणार नाही, दंड भरणार नाही. गरज पडली तर जेलमध्ये बसेन; पण दबावाला झुकणार नाही.” तसेच काही राजकीय नेत्यांकडून आरोपींना संरक्षण दिले जात असल्याचाही त्यांनी अप्रत्यक्ष आरोप केला.
“धमक्या मिळत आहेत, सुरक्षा नाही”
दरम्यान, आपल्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही लवांडेंनी केला. “आमच्या पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांना निवेदन देऊन सुरक्षा मागितली होती. मात्र अद्याप कोणतीही सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही,” असे ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, पोलिसांची भूमिका, राजकीय दबाव आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.


