पालघर प्रतिनिधी
लग्नसराईच्या उत्साहात निघालेलं वऱ्हाड काही तासांतच मृत्यूच्या दरीत कोसळलं आणि संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या १२ जणांच्या पार्थिवांवर आज डहाणू तालुक्यातील बापूगाव येथे एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र अंत्यसंस्कार होत असल्याने संपूर्ण परिसर हळहळला. महिलांचा आक्रोश, नातेवाईकांचा हंबरडा आणि डोळ्यांत अश्रू घेऊन उभे असलेले गावकरी हे दृश्य प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकणारं होतं.
सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १२ जणांची पार्थिवं आज सकाळी बापूगावात आणण्यात आली. लखनपाडा परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या पार्थिवांवर अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. “कालपर्यंत साखरपुड्याच्या तयारीत असलेले हे चेहरे आज कायमचे शांत झाले,” अशी भावना व्यक्त करत अनेक गावकरी अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.
आनंदाच्या प्रवासावर मृत्यूची सावली
डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून हे वऱ्हाड धानिवरी येथे साखरपुड्यासाठी निघाले होते. टेम्पोमध्ये नातेवाईक, महिला आणि लहान मुलांसह गावकरी मोठ्या उत्साहात प्रवास करत होते. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. महामार्गावर एक किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी चालकाने आऊटसाईडने टेम्पो नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गुजरातहून मुंबईकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने प्रथम एका दुचाकीस्वाराला चिरडलं आणि त्यानंतर नियंत्रण सुटून थेट वऱ्हाडाच्या टेम्पोवर पलटी झाला.
क्षणात टेम्पोचा चक्काचूर झाला. कंटेनरखाली दबून अनेक जण जागीच ठार झाले. अपघातानंतर महामार्गावर किंकाळ्या, रक्ताचे डाग आणि मदतीसाठी धावणाऱ्या नागरिकांची धावपळ पाहून परिसर हादरून गेला.
१२ जणांचा जागीच मृत्यू; २५ हून अधिक जखमी
या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर डहाणू आणि परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली. धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात १७ जखमींवर उपचार सुरू असून डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
एकाच वेळी १२ चिता पेटल्या… गाव ढसाढसा रडलं
दुपारच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत १२ पार्थिवांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. एकामागोमाग एक चिता पेटत असताना संपूर्ण गाव सुन्न झालं होतं. अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते, तर काही वृद्ध नातेवाईकांना धीर देण्यासाठी ग्रामस्थांना पुढे यावं लागलं. “असा दिवस गावावर कधीच आला नव्हता,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती. अनेकांच्या हातात मृतांच्या छायाचित्रांसह पुष्पहार दिसत होते. तरुणांच्या अकाली मृत्यूने गावातील वातावरण भारावून गेलं.
सरकारकडून मदतीची घोषणा
या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, स्थानिक खासदार तसेच जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. जखमींना कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही मंत्री उईके यांनी दिली. “आदिवासी विकास विभाग जखमींच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. रुग्णालय ते गाव प्रवास, राहण्याची व्यवस्था आणि उपचारांची जबाबदारी सरकार घेणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत प्रशासनाला तातडीने मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गावात सणाऐवजी शोक
ज्या घरांत साखरपुड्याची तयारी सुरू होती, तिथे आता शोककळा पसरली आहे. कालपर्यंत वाजणारे ढोल-ताशे आणि लग्नगीतांच्या जागी आज रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने बापूगाव अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही.


