पालघर प्रतिनिधी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सोमवारी दुपारी रक्ताने माखला. लग्नसमारंभासाठी निघालेल्या वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यातील धानीवरी गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेनंतर घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले. रस्त्यावर विखुरलेले मृतदेह, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले जखमी आणि भर उन्हात नातेवाइकांचा आक्रोश यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.
लग्नाचा आनंद क्षणात शोकात बदलल्याने पालघरसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
धडक इतकी भीषण की ट्रक पलटी
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे शंभर वऱ्हाडी मंडळी आयशर ट्रकमधून लग्नासाठी जात होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानीवरी गावाजवळ पोहोचताच समोरील भरधाव कंटेनरने ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले. अपघातानंतर ट्रकचा ताबा सुटून तो रस्त्यावर पलटी झाला. अनेक प्रवासी ट्रकखाली दबले गेले, तर काही जण वाहनाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये अडकून पडले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातानंतर काही क्षण संपूर्ण परिसरात किंकाळ्या आणि मदतीसाठी आर्त हाका घुमत होत्या. जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले.
ग्रामस्थांचे धाडस; प्रशासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य
अपघाताची माहिती मिळताच पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. ट्रकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालय तसेच धुंदलवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयांत हलवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
रुग्णालय परिसरात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या माणसांचा शोध घेताना अनेकांचा बांध फुटला. रुग्णालयातही हंबरडा आणि आक्रोशाचे वातावरण पाहायला मिळाले.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती
प्राथमिक तपासात वऱ्हाडाच्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. अतिवेग, चालकाचे दुर्लक्ष अथवा तांत्रिक बिघाड यांपैकी नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे मालवाहू वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि जीव धोक्यात घालून होणारी वाहतूक यावर आता कठोर कारवाईची मागणी होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त
या भीषण दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. “पालघरच्या धानीवरी येथे झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींवर सर्वोत्तम उपचार सुरू असून प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे,” असे त्यांनी म्हटले.
तसेच या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.


