पालघर प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी (NOC) तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तारापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संध्या संजय पागधरे (वय ४७) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई १३ मे रोजी करण्यात आली.
तक्रारदार हे स्वतःचा डाय-मेकिंग (औद्योगिक कटिंग) व्यवसाय सुरू करण्यासाठी एसबीआय बँकेत कर्जप्रकरण दाखल करीत होते. कर्ज प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. याच NOC साठी सरपंचांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबी पालघर कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ग्रामपंचायत सामान्य पावतीसाठी २ हजार रुपये आणि स्वतःसाठी ४ हजार रुपये अशी मागणी निश्चित करण्यात आल्याचे तपासात समोर आले.
यानंतर सापळा रचून एसीबीच्या पथकाने ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सरपंचांना पकडले. ही कारवाई तारापूर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय कर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, पालघर एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा लोकसेवक कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.


