कोलकाता वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या राजकारणात शुक्रवारी ऐतिहासिक घडामोड घडली. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ डाव्या आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रभावाखाली राहिलेल्या बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाने सत्तेवर झेंडा रोवत नवा राजकीय अध्याय सुरू केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नंदीग्रामचे आमदार सुरेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतली.
राज्यपाल आर. एन. रवी यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात सुवेंदू अधिकारी यांच्यासह पाच मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. बंगालच्या राजकीय इतिहासात या सोहळ्याकडे ‘सत्तांतराचा निर्णायक क्षण’ म्हणून पाहिले जात आहे.
भाजपचा दणदणीत विजय
विधानसभा निवडणुकीत भाजपने २९३ पैकी तब्बल २०७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत संपादन केले. दुसरीकडे, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला अवघ्या ८० जागांवर समाधान मानावे लागले. अनेक दशकांपासून बंगालमध्ये भाजपला मर्यादित राजकीय उपस्थिती असताना, या निवडणुकीत पक्षाने अभूतपूर्व कामगिरी करत सत्ता हस्तगत केली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ग्रामीण भागातील वाढता असंतोष, भ्रष्टाचाराचे आरोप, रोजगाराचा प्रश्न आणि हिंसाचाराच्या मुद्द्यांवर भाजपने आक्रमक प्रचार राबवत मतदारांपर्यंत पोहोच साधली. विशेषतः उत्तर बंगाल, जंगलमहल आणि सीमावर्ती भागात भाजपला मोठे यश मिळाले.
सुवेंदू अधिकारी यांची झपाट्याने वाढलेली राजकीय कारकीर्द
कधीकाळी तृणमूल काँग्रेसमधील प्रभावी चेहरा असलेले सुवेंदू अधिकारी यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पक्षाच्या बंगाल मोहिमेचे प्रमुख शिल्पकार ठरले. नंदीग्राममधील लढतीत त्यांनी स्वतः ममता बॅनर्जी यांना पराभूत करून राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले होते.
भाजप विधायक दलाच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला आणि काही तासांतच शपथविधी पार पडला.
राष्ट्रीय नेतृत्वाची उपस्थिती
शपथविधी सोहळ्यासाठी कोलकात्यात राजकीय दिग्गजांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. पंतप्रधान Narendra Modi, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्षीय पातळीवरील वरिष्ठ नेते तसेच देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी भाजप नेते भूपेंद्र यादव, S सुकांत मुजुमदार, लॉकेट चॅटर्जी, शांतनु ठाकूर,
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कोलकात्यात जल्लोष साजरा केला.
नव्या मंत्रिमंडळातील पाच प्रमुख चेहरे
दिलीप घोष
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बंगालमध्ये भाजपचा विस्तार घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मेदिनीपूरचे माजी खासदार असलेले घोष यांना संघटन आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अग्निमित्रा पॉल
फॅशन डिझायनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्निमित्रा पॉल यांनी अल्पावधीतच भाजपमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. महिला मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर प्रचार मोहीम राबवली होती. महिलांशी संबंधित प्रश्न आणि शहरी विकासाच्या मुद्द्यांवर त्यांचा प्रभावी आवाज मानला जातो.
अशोक कीर्तनिया
उत्तर २४ परगणा भागातील प्रभावी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. व्यवसायिक पार्श्वभूमी असलेल्या कीर्तनिया यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे.
निशीथ प्रमाणिक
तरुण नेतृत्व म्हणून उदयास आलेल्या निशीथ प्रमाणिक यांनी केंद्रात राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. उत्तर बंगालमध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. माथाभांगा मतदारसंघातून त्यांनी पुन्हा विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व कायम राखले.
खुदीराम टुडू
आदिवासी समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून खुदीराम टुडू यांच्याकडे पाहिले जाते. शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या टुडू यांनी जंगलमहल भागात भाजपची पकड मजबूत केली. आदिवासी विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधांवर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
‘सोनार बंगला’चा नारा
शपथविधीनंतर बोलताना मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी “सोनार बंगला” घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. “राज्यात विकास, गुंतवणूक, उद्योग, रोजगारनिर्मिती आणि कायदा-सुव्यवस्था यावर सरकारचे प्राधान्य असेल. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचवेळी त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर तीव्र टीका करत हिंसाचार, आर्थिक मंदी आणि कथित भ्रष्टाचारामुळे बंगालची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप केला. नव्या सरकारकडून उद्योग गुंतवणूक वाढवणे, सीमावर्ती भागातील सुरक्षा बळकट करणे आणि रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले.
बंगालच्या राजकारणातील नवा अध्याय
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या सत्तांतरामुळे राष्ट्रीय राजकारणातही मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपने पूर्व भारतातील आपला प्रभाव अधिक मजबूत केला असून, तृणमूल काँग्रेससमोर अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, बंगालमधील हे परिवर्तन केवळ सत्तांतर नसून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांमध्ये झालेला मोठा बदल मानला जात आहे. आता सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील सरकार ‘परिवर्तन’ची घोषणा प्रत्यक्षात उतरवते का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


