मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे पूर्व येथील न्यू शासकीय वसाहतीतील इमारत क्रमांक सी-१ वनमधील लिफ्ट अचानक बंद पडल्याने १६ महिन्यांच्या चिमुरड्यासह तिघेजण तब्बल १५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकून पडल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. या प्रकारामुळे शासकीय इमारतींच्या देखभाल व्यवस्थेतील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला असून रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या १६ महिन्यांच्या बाळासह आणि एका पुरुषासोबत सायंकाळी साडेसातच्या सुमारास लिफ्टने तळमजल्यावर येत होती. त्यावेळी दुसऱ्या मजल्याजवळ अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने लिफ्ट मध्येच बंद पडली. काही क्षणांतच लिफ्टमधील दिवेही बंद झाल्याने आत अडकलेल्या तिघांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अंधार, गुदमरलेले वातावरण आणि चिमुरड्याच्या रडण्यामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली होती.
घटनेदरम्यान महिलेने प्रसंगावधान राखत लिफ्टमधील आपत्कालीन मदत बटण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते बटण कार्यरत नसल्याचे समोर आले. त्यानंतर लिफ्ट ऑपरेटरला संपर्क साधण्यात आला असता, “पोहोचायला वेळ लागेल,” असे उत्तर देण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. आपत्कालीन परिस्थितीतही यंत्रणेचा प्रतिसाद अत्यंत निष्काळजी असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
अखेर अडकलेल्या महिलेने आपल्या नातेवाईकांना मोबाईलवरून संपर्क साधून मदतीची विनंती केली. त्यानंतर कुटुंबीय, मित्र आणि काही स्थानिक रहिवासी घटनास्थळी धावून आले. अथक प्रयत्नांनंतर लिफ्टचे दरवाजे उघडण्यात यश आले आणि तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र, मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
दरम्यान, या शासकीय वसाहतीतील लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही संतप्त रहिवाशांनी उपस्थित केला.
या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित देखभाल यंत्रणा आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच सर्व लिफ्टची तांत्रिक तपासणी करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.


