मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर उद्या, ८ मे रोजी जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेचा निकाल दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
यंदा राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या परीक्षेला हजेरी लावली होती. बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर दहावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात अधिकृत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत निकालाची टक्केवारी, विभागनिहाय निकाल, मुला-मुलींची कामगिरी, उत्तीर्णतेचे प्रमाण यासह विविध महत्त्वाची माहिती जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.
‘या’ वेबसाईटवर पाहता येणार निकाल
विद्यार्थ्यांना पुढील अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे :
results.digilocker.gov.in
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
mahahsscboard.in
दहावीचा निकाल कसा पाहाल?
सर्वप्रथम mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
होमपेजवर ‘SSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर आपला सीट नंबर आणि आईचे नाव नमूद करा.
पुढे ‘View Result’ या बटणावर क्लिक करा.
काही क्षणांत तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील वापरासाठी निकालाची प्रिंट किंवा पीडीएफ सेव्ह करून ठेवा.
निकालाच्या दिवशी संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक वाढण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे. तसेच, ऑनलाईन दिसणारी गुणपत्रिका ही तात्पुरती असून, मूळ गुणपत्रिका संबंधित शाळांकडून पुढील काही दिवसांत वितरित केली जाणार आहे.


