पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत निकालात २.०९ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. एकूण १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले असून त्याचा निकाल ९४.१४ टक्के इतका नोंदला गेला. तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के इतका राहून तो सर्वात कमी ठरला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांतील १४ लाख ४४ हजार ७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
मुलींच्या कामगिरीत यंदाही सातत्य दिसून आले. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९३.१५ इतका असून मुलांचा ८६.८० टक्के आहे. यामुळे मुलींचा निकाल मुलांपेक्षा ६.३५ टक्क्यांनी अधिक ठरला आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल मात्र तुलनेने कमी लागला. ५९ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५० हजार ३४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्यांपैकी १८ हजार ३४९ (३६.४४ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. खासगी विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ९४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील २९ हजार ६३४ (८०.२१ टक्के) उत्तीर्ण झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल समाधानकारक ठरला असून ८ हजार ३६७ विद्यार्थ्यांपैकी ७ हजार ५७९ (९०.५८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सचिव डॉ. दीपक माळी उपस्थित होते.
दरम्यान, परीक्षेदरम्यान घडलेल्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यात आल्याचेही मंडळाने स्पष्ट केले. कॉपी रोखण्यासाठी राज्य व जिल्हास्तरीय दक्षता समित्या सक्रिय करण्यात आल्या होत्या. तरीही राज्यभरात एकूण १५ गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले. त्यात छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे प्रत्येकी तीन, अमरावतीत आठ आणि लातूरमध्ये एक प्रकरण नोंदविण्यात आले.
गैरप्रकारांबाबत शिस्तभंगाची कारवाई करत एकूण १०० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यात अमरावतीतील ५०, छत्रपती संभाजीनगरमधील ४३, नागपूरमधील ४ आणि लातूरमधील ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
गैरप्रकारांची आकडेवारीही लक्षणीय आहे. राज्यभरात एकूण १,९८३ प्रकरणे समोर आली. यामध्ये २३७ कॉपी प्रकरणे, १,४६९ सामुदायिक कॉपी प्रकरणे, परीक्षकांनी निदर्शनास आणून दिलेली २२३ प्रकरणे आणि इतर ५३ प्रकरणांचा समावेश आहे. लातूरमध्ये तोतयागिरीचे एक प्रकरण आढळून आले.
निकालानंतर विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय मंडळाने घेतला आहे. यंदा प्रथमच गुणपत्रिका (मार्कशीट) आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र एकाच वेळी देण्यात येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत ही कागदपत्रे शाळांमार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत. नव्या गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांचा छायाचित्र व क्यूआर कोड असणार असून, या प्रक्रियेमुळे सुमारे ३ कोटी रुपयांची बचत झाल्याचे मंडळाने स्पष्ट केले.


