रणजित मस्के, प्रतिनिधी
निजामपूर: निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाटगे पाटील इंडस्ट्रीजच्या टॉवरमधून कॉपर केबलची चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीची केबल आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ४ लाख १० हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे परिसरातील चोरीच्या तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
नवापाडा शिवारात २० मार्च २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास घाटगे पाटील इंडस्ट्रीजच्या एल-११ टॉवरमधील १६० मीटर लांबीची महागडी कॉपर केबल चोरट्यांनी कापून नेली होती. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगलदास महारू चौरे याला पांगण (ता. साक्री) येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून या मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला.
पोलिसांनी मंगलदास चौरे याच्यासह खंडू गुलाब गायकवाड, अनिल चिंधा ठाकरे, गोट्या गोपीचंद अहिरे, गुलाब गोकुळ बागुल, राहुल बाबूलाल गायकवाड, संजय रामलाल गायकवाड आणि ताराचंद मन्साराम ठाकरे (सर्व राहणार पांगण, ता. साक्री) यांना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इको कार (क्र. एम.एच. १८ सी.एल. २०४९) आणि कॉपर केबल हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. आर. बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली
तपास पथक: सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियदर्शनी थोरात, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमासे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कलीम शेख, पोलीस हवालदार नारायण माळचे, पोलीस हवालदार प्रशांत ठाकुर, पोलीस हवालदार प्रदिप आखाडे, पोलीस शिपाई दिपक महाले, पोलीस शिपाई राकेश महाले, पोलीस शिपाई प्रवीण पवार, पोलीस शिपाई गौतम अहिरे, पोलीस शिपाई सुनील अहिरे, पोलीस शिपाई पृथ्वीराज शिंदे, पोलीस शिपाई परमेश्वर चव्हाण, पोलीस शिपाई राकेश बोरसे आणि चालक पोलीस शिपाई मोहन माळी.


