रणजित मस्के, प्रतिनिधी
गोंदिया : जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सुंदरनगर परिसरात धाड टाकून एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून २ किलो ७० ग्रॅम गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ७६,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक २९ एप्रिल रोजी गोंदिया शहर हद्दीत गस्तीवर असताना, सुंदरनगर येथील इमरान मुस्ताक शेख (३०) हा आपल्या घरी गांजाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी पंचासमक्ष घराची झडती घेतली असता, हॉलमध्ये पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत ४०,१४० रुपये किमतीचा २ किलो ७० ग्रॅम ओला गांजा आढळून आला.
यासोबतच गांजा विक्रीतून मिळालेले २०,९०० रुपये रोख आणि व्यवसायासाठी वापरला जाणारा १५,००० रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची चौकशी केली असता, त्याने हा गांजा बसंतनगर येथील गोविंद अग्रवाल याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. हा माल एका इर्टिका कारच्या चालकामार्फत पुरवण्यात आला होता. या तिन्ही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात मपोउपनि वनीता सायकर, स.फौ. राजेन्द्र मिश्रा, पो.हवा. महेश मेहर, पो.हवा. सुबोध बिसेन, पोहवा इंद्रजित बिसेन, पोहवा प्रकाश गायधने, पो.शि. छगन विठ्ठले, पो.शि. इंदुरकर, पो.शि. पाटील आणि चापोशि राम खंदारे यांनी केली आहे.


