रणजित मस्के, प्रतिनिधी
सोलापूरची ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा आणि सध्या सुरू असलेल्या लग्नकार्यांचा सांधा साधून दागिने चोरी करणाऱ्या दोन सराईत महिलांना जेरबंद करण्यात शहर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शहर परिसरात वाढत्या घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मुकेश गायकवाड यांच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या.
अशी झाली कारवाई
पहिली कारवाई २६ एप्रिल रोजी सोलापूर ग्रामीण हद्दीत करण्यात आली. यावेळी निता किरण काळे (वय ४५, रा. लोकमंगल साखर कारखाना जवळ, मोहोळ) हिला ताब्यात घेण्यात आले. तिने सिद्धेश्वर गड्डा यात्रेत चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून ९.५ ग्रॅमचे चांदीचे ब्रेसलेट आणि ६ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले असून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई २७ एप्रिल रोजी करण्यात आली. यात मोनिका प्रशांत रोहिते (वय ३२, रा. जुनी लक्ष्मी मिल चाळ, सोलापूर) हिला ताब्यात घेतले. तिने हिप्परगा गाव (तुळजापूर रोड) येथील एका लग्नकार्यात सोन्याचा हार आणि बोरमाळ चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ३ लाख रुपये) हस्तगत करून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या पथकाने बजावली कामगिरी
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उप-निरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, सुमित्रा बारबोले, निलोफर तांबोळी आणि चालक बाळू काळे, सतिश काटे यांनी मिळून केली आहे.


