सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असून, शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणात मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन करण्यात येणार असून, त्यानंतर आकर्षक व शिस्तबद्ध संचलन (परेड) पार पडणार आहे.
महाराष्ट्र दिन हा राज्याच्या स्थापनेचा अभिमानास्पद दिवस असल्याने जिल्हा प्रशासनाने यंदाच्या सोहळ्याला विशेष महत्त्व दिले आहे. पोलीस दल, होमगार्ड, तसेच विविध शासकीय पथकांचा सहभाग असलेली परेड या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. देशभक्तीपर वातावरणात होणाऱ्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाख परिधान करावा, तसेच सर्व निमंत्रितांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किमान १५ मिनिटे आधी उपस्थित राहून आपापल्या आसनांवर बसावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान शिस्त आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्य शासकीय समारंभात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये व संस्थांना १ मे रोजी सकाळी ७.१५ ते ९ या वेळेत ध्वजवंदन किंवा अन्य कार्यक्रम आयोजित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या संस्था किंवा कार्यालयांना स्वतंत्रपणे ध्वजवंदन करायचे असेल त्यांनी तो कार्यक्रम सकाळी ७.१५ पूर्वी किंवा सकाळी ९ नंतरच आयोजित करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित या मुख्य समारंभात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राज्याभिमानाचा गौरव वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


