मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं असून, आता या प्रश्नाला राजकीय रंगही चढताना दिसत आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी ठाम भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही समर्थन मिळाल्याने हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येणार आहे. येत्या १ मे, महाराष्ट्र दिन पासून या नियमांची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा मानस आहे. मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला असून, गरज पडल्यास परवाना रद्द करण्यासारखी कठोर पावले उचलली जाऊ शकतात.
मात्र, या निर्णयाला मुंबईतील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. काही संघटनांनी थेट संपाचा इशाराही दिला असून, त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री सरनाईक यांनी विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. बैठकीत मराठी शिकवण्यासाठी विशेष प्रशिक्षण, तसेच अंमलबजावणीसाठी काही कालावधी देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. राज्यात व्यवसाय करायचा असेल, तर मराठी येणं आवश्यक आहे. आम्ही या निर्णयावर ठाम आहोत. मात्र, चालकांना मराठी शिकण्यासाठी काही कालावधी द्यायचा का, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान, या मुद्द्यावर राजकीय मतभेदही समोर आले आहेत. शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी भाषेची सक्ती करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करत या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. “कोणावरही कोणतीही भाषा लादणे योग्य नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
तरीही महायुतीतील इतर घटक पक्षांनी मात्र सरनाईक यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनीही या निर्णयाचे स्वागत करत स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर राखणे आवश्यक असल्याचे सांगितले.
“देशात कुठेही गेलो तरी त्या प्रदेशाची भाषा आणि संस्कृती आत्मसात करणे गरजेचे आहे. विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. ते टिकवण्यासाठी स्थानिक भाषेला प्राधान्य द्यावे लागेल,” असे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले की, “मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा आदर करावा. रिक्षा-टॅक्सी चालक प्रवाशांशी थेट संवाद साधत असल्याने त्यांना मराठी येणे ही काळाची गरज आहे.”
त्याचबरोबर त्यांनी मराठी प्रवाशांनाही आवाहन केले की, “प्रवास करताना जाणीवपूर्वक मराठीचा वापर करावा.”
एकीकडे सरकारचा ठाम पवित्रा आणि दुसरीकडे चालक संघटनांचा विरोध यामुळे मराठी सक्तीचा मुद्दा येत्या काही दिवसांत अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अंमलात येतो का, की सरकार काही दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


