सातारा प्रतिनिधी
सातारा : येथील शिवतीर्थ, पोवई नाका परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवचरित्र प्रसार अश्वमोहीमे’चे मंत्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात स्वागत करण्यात आले. दिग्विजय प्रतिष्ठान, पुणे आणि हॉर्स रायडिंग अकॅडमी यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ही अश्वमोहीम राबविण्यात येत असून, स्वराज्यातील २५ किल्ल्यांवर अश्वारोहण करत इतिहास जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत ९ ते २२ वयोगटातील युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
या उपक्रमामुळे शिवरायांच्या कार्याला उजाळा मिळण्यासोबतच अश्वारोहण कलेलाही चालना मिळणार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमास गणेश पुरंदरे, महेश शिवदे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, फिरोज पठाण, विजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.


