रणजीत मस्के प्रतिनिधी
पुणे : सिंहगड रोड परिसरातून महागड्या गाड्या चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची एक ‘इन्होव्हा क्रिस्टा’ कार आणि एक दुचाकी, असा एकूण १२ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गौरव जनार्धन कडू (वय ३२, रा. नांदेडगाव, पुणे; मूळ रा. वेल्हे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
७० सीसीटीव्ही अन् तांत्रिक तपासाचे यश
१५ एप्रिल २०२६ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार चोरीला गेली होती. याप्रकरणी बीएनएस कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने नांदेड सिटी परिसरातील सुमारे ७० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला.
सापळा रचून अटक
तपास पथकातील कर्मचारी उत्तम तारु, राहुल ओलेकर आणि सागर शेडगे यांना खबर मिळाली की, संबंधित चोरटा एका मोपेड गाडीसह शरद हॉस्पिटल ते प्रयोजा सिटी रोडवर थांबला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गौरव कडू याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडील मोपेड ही देखील वर्षभरापूर्वी नांदेड सिटी परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले.
बनावट चावीचा वापर
पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने इनोव्हा कार चोरल्याची कबुली दिली. आरोपीने गाडी चोरण्यासाठी बनावट चावीचा वापर केला होता, जी त्याच्या घरातून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून पोलीस हवालदार उत्तम तारु या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
यांनी केली कामगिरी:
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, सतिष मोरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, तानाजी सागर, संदिप कांबळे, समीर माळवदकर, विनायक मोहीते आणि शिरीष गावडे यांच्या पथकाने केली आहे.


