नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेतील सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या घडामोडींवर ‘आप’कडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते संजय सिंग यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर थेट निशाणा साधत, देशभरात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जात असल्याचा गंभीर आरोप केला.
AAP वरिष्ठ नेता एवं राज्यसभा सांसद @SanjayAzadSln और AAP नेशनल मीडिया प्रभारी @anuragdhanda की महत्वपूर्ण प्रेसवार्ता | LIVE https://t.co/XNbUh6EZDh
— AAP (@AamAadmiParty) April 24, 2026
संजय सिंह म्हणाले, “पंजाबच्या जनतेने या खासदारांना विश्वासाने निवडून दिले. मात्र त्यांनीच जनतेच्या विश्वासाला तडा दिला. हा केवळ पक्षांतराचा मुद्दा नसून लोकशाही मूल्यांवर घाला आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत.
‘ईडी-सीबीआयचा दबाव; ऑपरेशन लोटसचा भाग’
सिंह यांनी आरोप केला की, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणला जात आहे. “ईडी आणि सीबीआयच्या कारवायांनंतरच काही खासदारांनी भूमिका बदलली, हे योगायोग नाही,” असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी अशोक मित्तल यांच्या ठिकाणी ईडीची कारवाई झाल्याचा संदर्भ देत त्यांनी या घटनाक्रमाकडे ‘संशयास्पद’ म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली.
‘भाजपमध्ये जाऊन भ्रष्टाचारविरोधी भूमिका कशी?’
भाजपवर टीका करताना संजय सिंह यांनी “स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक संघटित भ्रष्टाचार करणारा पक्ष म्हणजे भाजप,” असा आरोप केला. “अशा पक्षात सामील होऊन कोणी स्वतःला प्रामाणिक कसे म्हणू शकते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पक्षांतरित खासदारांवर टीकास्त्र
भाजपमध्ये दाखल झालेल्या खासदारांवर टीका करताना त्यांनी राघव चड्डा यांच्यासह इतरांवर निशाणा साधला. “जनतेच्या विश्वासाशी केलेल्या या फसवणुकीला पंजाबची जनता कधीही विसरणार नाही. योग्य वेळी लोकशाही मार्गाने त्यांना उत्तर दिले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
राजकीय परिणामांवर लक्ष
दरम्यान, या घडामोडींमुळे पंजाबच्या राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात ‘आप’ आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. विरोधी पक्षांकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, राष्ट्रीय राजकारणात या प्रकरणाचे पडसाद उमटणार का, याकडे लक्ष लागले आहे.


