रणजीत मस्के” प्रतिनिधी
पुणे ग्रामीण जिल्ह्यात बेकायदेशीर अग्नीशस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. नारायणगाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि जिवंत काडतूसांसह तिघांना अटक केली आहे.
पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी गोपनीय माहितीच्या आधारे नारायणगाव पोस्टे हद्दीतील कारफाटा येथे सापळा लावण्यात आला. संशयित राहुल सुरेश साळवे (रा. साकोरी तर्फे बेल्हे, ता. जुन्नर) हा त्याच्या साथीदारांसह इर्टिगा (MH 06 BE 4626) गाडीतून येताना ताब्यात घेण्यात आला.
पंचासमक्ष अंगझडतीदरम्यान राहुल साळवे व त्याचा साथीदार तेजस संदीप मातेले (वय २१, रा. नारायणगाव) यांच्या कमरेला दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. यावेळी दर्पण सुरेश पवार (वय २२, रा. नारायणगाव) यालाही ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसे आणि वाहन असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सपोनि. महादेव शेलार, सफौ. दीपक साबळे, पोहवा. संदीप वारे आणि पोशी. अक्षय नवले यांनी केली.


