पंढरपूर प्रतिनिधी
राज्यसभा कार्यकाळ संपत आला की एकीची भाषा करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे प्रत्यक्षात केवळ खासदारकी टिकवण्यासाठीच प्रयत्न करत असल्याचा टोला आनंदराज आंबेडकर यांनी लगावला. तसेच समाजाने भोंदू बाबांच्या मागे न लागता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पंढरपूर येथे आले असताना आनंदराज आंबेडकर बोलत होते. अलीकडच्या काळात राज्यात उघडकीस येत असलेल्या बुवाबाजीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजातील सुशिक्षित घटकांवरही टीका केली. “पुरोगामी विचारांचा आणि शिक्षणात आघाडीवर असलेला महाराष्ट्र आज भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकताना दिसत आहे, ही चिंताजनक बाब आहे,” असे ते म्हणाले.
बुवाबाजीच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अंधश्रद्धा आणि ढोंगीपणाला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना थारा देण्याऐवजी समाजाने विवेकनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. “भोंदू बाबांच्या मागे धावण्याऐवजी बाबासाहेबांच्या विचारांकडे वळले, तरच समाजाची खरी प्रगती होईल,” असे ते म्हणाले.
राजकीय पातळीवर बोलताना त्यांनी रामदास आठवले यांच्यावर टीकेची झोड उठवली. “राज्यसभा कार्यकाळ संपत आला कीच एकीची भाषा केली जाते. दबाव तंत्राचा वापर करून पुन्हा खासदारकी मिळवण्याचा प्रयत्न होतो,” असा आरोप त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीतील एकजुटीच्या प्रश्नालाही त्यांनी स्पर्श केला.
आनंदराज आंबेडकर हे आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी ‘रिपब्लिकन सेना’ या पक्षाची स्थापना केली असून ते वंचित बहुजन राजकारणातील सक्रिय चेहरा आहेत. ते प्रकाश आंबेडकर यांचे बंधू असून आंबेडकरी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी विविध स्तरांवर काम करत आहेत.
दरम्यान, राज्यात उघड होत असलेल्या बुवाबाजीच्या घटनांमुळे समाजात पुन्हा एकदा अंधश्रद्धा विरुद्ध विवेकवाद हा वाद तीव्र होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरवादी विचारांकडे परतण्याचे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केल्याने या चर्चेला अधिक धार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


